महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात अनेक महिने प्रदीर्घ सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तीवाद केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने यावरील निकाल चार दिवसांपूर्वी जाहीर केला. सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय मात्र विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आता यावर निकाल देतील. शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यांना विश्वास आहे की, हा निकाल त्यांच्या बाजूने लागेल आणि १६ आमदार अपात्र होतील. परंतु शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वेगळ मत मांडलं आहे.
अजित पवार म्हणाले की, आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. २८८ पैकी यदाकदाचित त्या १६ आमदारांचा निकाल काही वेगळा (आमदार अपात्र ठरले) लागला. वेगळा निकाल लागणारच नाही म्हणा. पण समजा लागला तरी त्या निकालाचा सरकारच्या बहुमतावर कुठलाही परिणाम होणार नाही.
अजित पवार म्हणाले २८८ पैकी १६ आमदार अपात्र ठरले तर राहतात २७२ आमदार, मग बहुमताचा आकडा कमी होतो. तेवढं बहुमत त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा काहिही परिणाम सरकारवर होईल असं आत्तातरी दिसत नाही.
राज्यात एकनाथ शिंदेंचा गट आणि भारतीय जनता पार्टीकडे बहुमत असल्याने ते सत्तेत आहेत. १६ आमदार जर अपात्र ठरले तर बहुमताचा आकडा १३७ इतका कमी होईल आणि तितके आमदार शिंदे आणि फडणवीसांकडे आहेत. असं अजित पवारांना सुचवायचं होतं. तसेच हे आमदार अपात्र ठरणार नाहीत असा विश्वासही त्यांना वाटतो.