राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी “पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा असेल” असं विधान केलं आहे. लंके यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनीही सूचक विधान केलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी माझी इच्छा आहे, असं विधान रोहित पवार यांनी केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
खरं तर, पवार कुटुंबीयांनी आज दिवाळीनिमित्त बारामतीतील गोविंद बागेत भेटीचं आयोजन केलं होतं. पवार कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक याठिकाणी आले होते. या कार्यक्रमात शरद पवार यांच्यासह, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि इतरही अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान, रोहित पवार यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना मोठं विधान केलं आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी आपली इच्छा आहे, असं ते म्हणाले.
आपली इच्छा व्यक्त करताना रोहित पवार म्हणाले की, अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, असं अनेक लोकांचं मत आहे. माझंसुद्धा हेच मत आहे. पण शेवटी आपल्याला आकड्यांचं समीकरण लक्षात घ्यावं लागेल. येत्या काळात मित्रपक्षांना विश्वासात घेऊन आमचे पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल.
हेही वाचा- “राज्याचे पुढचे मुख्यमंत्री राष्ट्रवादीचेच, कोण होणार ते…”, आमदार निलेश लंकेंचं सूचक वक्तव्य!
“एखादी ताकदवान व्यक्ती जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होईल, ज्याचा प्रशासनावर वचक असेल आणि त्यांची काम करण्याची पद्धत लोकांना माहीत असेल. तेव्हा प्रशासनाचीही निर्णय घेण्याची क्षमताही वाढते. निर्णय लवकर घेतले तर लोकांनाही याचा फायदा होत असतो” अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.