विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या खास भाषणशैलीसाठी ओळखले जातात. कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्टवक्तेपणा हाही त्यांचा गूण मानला जातो. शिवाय सभांमध्ये श्रोत्यांना अगदी खिळवून ठेवत खसखस पिकवत त्यांचं बोलणं हेही एक वैशिष्ट्य. याचाच दर्शन उस्मानाबादमध्ये शनिवारी (१ ऑक्टोबर) एका सभेत पाहायला मिळालं आहे. या ठिकाणी अजित पवार यांनी थेट ‘चिट्ठी आयी हैं आयी हैं चिट्ठी आयी हैं’ हे गाणं गायलं. यानंतर सभेत जोरदार हशा पिकला.
अजित पवारांचं भाषण सुरू असताना श्रोत्यांमधून एका कार्यकर्त्याने पवारांना चिट्ठी देऊन आपला प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजित पवारांनी आपलं भाषण थांबवलं आणि त्या कार्यकर्त्यांची चिट्ठी द्या रे असं म्हणत थेट ‘चिट्ठी आयी हैं आयी हैं चिट्ठी आयी हैं’ हे गाणं गायलं.
व्हिडीओ पाहा :
यामुळे श्रोत्यांमध्ये जोरदार खसखस पिकली. सुरक्षा रक्षकाने ही चिट्ठी अजित पवारांकडे आणून दिली. त्यानंतर अजित पवारांनी ही चिट्ठी वाचून त्या प्रश्नावर मी लक्ष घालतो असं आश्वासन दिलं.
अजित पवार म्हणाले, “मी या प्रश्नाकडे लक्ष घालतो. मी साखर आयुक्तांशीही बोलतो. हे चुकीचं आहे. राणांचा कारखाना असो किंवा कुणाचाही असो, भाव दिलाच गेला पाहिजे.”
हेही वाचा : “उसाच्या २६५ बेण्याच्या नादाला लागू नका”, भाव हवा असेल तर कोणता ऊस लावावा? अजित पवारांनी दिली यादी…
“राणा भाजपात गेले असले तरी आमचं बोलणं बंद आहे असं काही नाही. मी त्यांच्याशीही बोलेन. मी त्यांनाही विचारेल की उसाच्या दराबाबत वस्तुस्थिती काय आहे,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.