राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते लवकरच मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी तशी इच्छा उघडपणे बोलून दाखवली आहे. यावर आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मला आनंद होईल, असं भास्कर जाधव म्हणाले. ते विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी चर्चा करत होते.
यावेळी भास्कर जाधव म्हणाले, “अजित पवार हे मुख्यमंत्री होणार आहेत, अशी चर्चा जशी तुम्ही ऐकली तशी मीही ऐकतोय. मीदेखील काही वर्तमानपत्रात याबद्दल वाचलं आहे. यामुळे एकंदरीत एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदारांची अस्वस्थता बघितली, तर या बातमीला कदाचित पुष्टी मिळतेय, असं माझं निरीक्षण आहे.”
हेही वाचा- “…हा आततायीपणा आहे”, अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीवर गिरीश महाजनांचं विधान
“एकनाथ शिंदेंपासून त्यांचे सगळे चेले-चपाटे, त्यांचे आमदार-खासदार आणि रामदास कदमसारखे मोठ्या घशाने ओरडणारे स्वयंघोषित नेते सातत्याने उद्धव ठाकरेंवर आरोप करत होते. शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला त्यांच्या मांडीवर नेऊन बसवलं, असा आरोप ते करत होता. आता अजित पवार खरोखर मुख्यमंत्री झाले, तर मला आनंद वाटेल. जे म्हणत होते, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर बसली. आता त्यांच्याच मानेवर जर अजित पवार बसले तर मला आनंद होईल,” असं थेट विधान भास्कर जाधव यांनी केलं आहे.
हेही वाचा- अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बच्चू कडूंची निवड, यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का
“सध्या अजित पवार अर्थखातं घेऊन त्यांच्या (एकनाथ शिंदे गटाच्या) मानेवर बसलेलेच आहेत. पण ते अजून वरती जाऊन बसले तर मला आनंद होईल,” असंही भास्कर जाधव पुढे म्हणाले.