राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी “तुम्ही दारू पिता का?” या वक्तव्यावरून राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना सत्तारांनी तुम्ही दारू पिता का? अशी विचारणा केली होती. याच मुद्द्यावर अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारचे कान टोचले. तसेच शिंदे गट आणि भाजपात वाचाळवीरांचं प्रस्थ वाढल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितल्याचंही त्यांनी नमूद केलं. ते मंगळवारी (१५ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनाही वेगवेगळ्या भेटीत सांगितलं की, शिंदे गट आणि भाजपात वाचाळवीरांचं प्रस्थ वाढलं आहे. ते काहीही बोलतात. बाकीच्या प्रवक्त्यांनी काय बोलावं हा त्या त्या पक्षांचा अधिकार आहे. त्यात मला टीपण्णी करण्याचं कारण नाही, पण मंत्रिमंडळातील सहकारीच ज्याप्रकारे वक्तव्य करत आहेत, त्यातून मंत्रिमंडळाची प्रतिमाही खराब होत आहे.”
“तुम्ही दारू पिता का? असं आपण विचारत नाही”
“लोक ऐकून घेतात, पाहतात आणि लक्षात ठेवत असतात. हे दुरुस्त केलं पाहिजे. काहीजण सहज बोलून जातात, ते सर्वांनी पाहिलं. आपण बोलताना कोणाला चहा पाहिजे असेल तर चहा घ्या, पाणी पाहिजे असेल तर पाणी घ्या, कॉफी पाहिजे असेल तर कॉफी घ्या. कोणी काहीच घेत नसेल तर दुध घ्या. तुम्ही दारू पिता का? असं आपण विचारत नाही. मात्र, मंत्र्यांची असं बोलण्यापर्यंत मजल गेली आहे,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : “पाटलाच्या पोराला लग्नाच्याही आधी यांच्याएवढी पोरं…”, राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
“ते सहज बोलायला नागरिक नाही, ते मंत्री आहेत”
“या वक्तव्यावर अब्दुल सत्तार म्हणतात की, मी सहजच तसं बोललो. मात्र, हे असं चालत नाही. ते सहज बोलायला नागरिक नाही. ते राज्याचे प्रतिनिधी आहेत, ते मंत्री आहेत, त्यांनी शपथ घेतली आहे. त्यांच्यावर जबाबदारी आहे,” असंही अजित पवारांनी सुनावलं.
अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले होते?
अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी सत्तार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी अब्दुल सत्तार, अर्जून खोतकर आणि काही अधिकारी चहा पिण्यासाठी बसले होते. तेव्हा जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी ‘चहा कमी पितो,’ असं म्हटलं. त्यावर अब्दुल सत्तारांनी “दारू पिता का?”, असा प्रश्न विचारला. त्यांच्या वक्तव्यानंतर तिथे असलेल्या सर्वांमध्ये एकच हशा पिकला.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर मोबाईलचा कॅमेरा सुरु असल्याचं पाहून सत्तार काहीसे गोंधळले. त्यांनी मोबाईलचा कॅमेरा बंद करण्यास सांगितला. मात्र, सत्तार यांचा “दारू पिता का?” हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतं आहे. तर, या व्हिडीओवरून काहींनी संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे.
हेही वाचा : अजित पवारांच्या नाराजीमुळे सत्तेची समीकरणं बदलणार? बावनकुळे म्हणाले “ते केव्हा बाहेर येतील आणि…”
सत्तार यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ‘अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा?,’ असा प्रश्न उपस्थित करत कविता ट्विट केली आहे.