शिंदे गटाकडून मंगळवारी १३ जून रोजी काही वर्तमानपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीवरून जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदासाठी लोकांची जास्त पसंती असल्याचा दावा या जाहिरातीत एका सर्वेक्षणाच्या हवाल्याने करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात शिंदे गट आणि भाजपामध्ये सारंकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यासंदर्भात बोलताना गजानन किर्तीकरांनी केलेल्या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठा दावा केला आहे.
काय म्हणाले गजानन किर्तीकर?
मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना २६ टक्के तर देवेंद्र फडणवीसांना २३ टक्के जनतेनं कौल दिल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणातून समोर आल्याचा दावा जाहिरातीत करण्यात आला आहे. त्यावरून भाजपा आणि शिंदे गटातील काही नेतेमंडळींमध्ये दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण रंगू लागलं आहे. त्यावर बोलताना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी भाजपाला सुनावलं आहे. “शिंदे गटाच्या ४० आमदारांमुळेच भाजपा सत्तेत आहे”, असं कीर्तीकर म्हणाले. यासंदर्भात अजित पवारांना आज झालेल्या पत्रकार परिषदेत विचारणा केली असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.
“ते खरंच बोललेत. यांच्या ४० आमदारांमुळे ते उपमुख्यमंत्री झालेत, त्यांच्या १०५ आमदारांमुळे हे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे ते असं म्हणणारच की”, असं अजित पवार म्हणाले.
कल्याणमधील उमेदवारीच्या वादावर प्रतिक्रिया
कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपा आणि शिंदे गटात वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. श्रीकांत शिंदे यांच्या खासदारकीला स्थानिक भाजपानं विरोध केला असून त्यावरून दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यासंदर्भात अजित पवारांना माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता त्यांनी त्यावर गंभीर दावा केला.
“भविष्यात शिंदे गटाचे आमदार भाजपात जातील”, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचं विधान चर्चेत
“ते म्हणालेत एकत्र लढणार, पण…”
“त्यांनी असं सांगितलंय की ते एकत्र लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. पण मला काही खासदारांनी सांगितलं की आम्ही जरी पाठिंबा दिला असला, तरी निवडणुकीच्या काळात आम्ही शिवसेनेचं चिन्ह घेणार नाही. भाजपाचं चिन्ह घेणार. याचा अर्थ तिकडे गेलेल्या काही खासदारांना शिवसेनेच्या चिन्हापेक्षा भाजपाचं चिन्ह जवळचं वाटतंय. घोडा-मैदान कुठे लांब आहे? ७-८ महिन्यांत आपल्याला कळेलच कुणी कुणाचं चिन्ह घेतलंय ते”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
अजित पवार यांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला!
“गेल्या एक वर्षात त्यांच्यात एकमेकांबाबत अस्वस्थता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. ठाणे जिल्हा आणि आसपासच्या भागात भाजपा विरुद्ध शिंदे गट असे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसतायत. नाराजी पाहायला मिळतेय. कुणीही थांबायला तयार नाही. मी सांगतो, जर असं अंतर वाढत गेलं, तरी नंतर कितीही समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, तरी कार्यकर्त्यांमध्ये आपलेपणा निर्माण होत नाही. दुरावा राहातो. त्याचा फटका एकत्र निवडणुकीला बसतो. आम्ही त्याचा अनुभव घेतलाय म्हणून सांगतोय”, असा सल्लाही अजित पवारांनी यावेळी सत्ताधारी भाजपा व शिंदे गटाला दिला.