विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या आक्रमक आणि हजरजबाबी स्वभावामुळे परिचित आहेत. कोणत्याही मुद्द्यावर त्यांच्या भूमिका बहुतांश वेळा सडेतोड असतात. विधासभेतील ते एक ज्येष्ठ सदस्य असल्यामुळे अनेकदा इतर आमदारांनी केलेल्या चुकांवर अजित पवार नाराजी व्यक्त करतात. अनेकदा तर ते भर सभागृहातच संबंधित आमदाराला किंवा प्रशासनाला त्यांच्या चुकांवरून ऐकवायला कमी करत नाहीत. मंगळवारी अशाच एका प्रसंगी अजित पवार यांनी भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांना खडे बोल सुनावले. यावेळी विखे पाटलांचं उदाहरण देताना त्यांनी खोचक टोला देखील लगावला.
नेमकं झालं काय?
विधानसभेत आपल्याला प्रश्न विचारू दिला नाही, या मुद्द्यावरून अभिमन्यू पवार संताप व्यक्त करत होते. त्यांनी थेट तालिका अध्यक्षांनाच जाब विचारायला सुरुवात केल्यामुळे अजित पवारांचा संताप झाला. “मला का बोलू दिलं नाही? मी काय वाईट केलंय तुमचं? मी सकाळी सकाळी आंघोळ करून एवढ्या सकाळी आलो. मला का बोलू दिलं नाही एवढं सांगा”, असं अभिमन्यू पवार बोलत होते.
दरम्यान, अभिमन्यू पवार यांचा आवाज चढताच त्यांना समज देण्यासाठी लागलीच अजित पवार उभे राहिले. “अभिमन्यू पवारांना विनंती आहे की असं तालिका अध्यक्षांना धमकावू नका. तुम्ही एकेकाळी सरकारमध्ये कामं केली आहेत. तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही. तुमच्यावर अन्याय झाला असेल, पण तुम्ही वेगळी आयुधं वापरा. अशा पद्धतीने कुणालातरी धमकावणं योग्य नाही”, असं अजित पवार म्हणाले.
राधाकृष्ण विखे पाटलांना टोला
यावेळी बोलताना अजित पवारांनी राधाकृष्ण विखे पाटलांना देखील चिमटा काढला. “विखे-पाटील तुम्ही एवढे ज्येष्ठ आहात. तुम्ही त्यांना चार गोष्टी सांगितल्या पाहिजेत. मी काल बघितलं..काल असंच विखे-पाटलांना बोलायचं होतं. माझं लक्ष होतं. पण जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फक्त ‘खाली बसा’ असं सांगितलं, तसे ते गप्प बसले. अजिबात बोलले नाहीत. अभिमन्यूजी हे मी स्वत: बघितलं”, असं अजित पवार म्हणाले.
“आज सकाळी आपण सगळे जमलो आहोत. लक्षवेधी चालू आहेत. आपण आता पार पाचव्यावर (विषय) गेलो आहोत. आपण अध्यक्षांना असं बोलू नका. हे बोलणं बरोबर नाही. काही परंपरा आहेत, काही पद्धती आहेत”, असं म्हणत अजित पवार हात जोडून खाली बसले.
अजित पवारांनी दम दिल्यानंतर शेवटी अभिमन्यू पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली.