राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्यावरून बराच वाद सुरू झाला आहे. भाजपानं या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली असताना आता राज्य सरकारकडून देखील जोरकसपणे बाजू मांडली जात आहे. सामना अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपावर या मुद्द्यावरून खोचक शब्दांमध्ये निशाणा साधलेला असताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील वाईन विक्री निर्णयाच्या मुद्द्यावरून विरोधकांना कानपिचक्या दिल्या आहेत. पुण्यात करोना परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
वाईन विक्रीच्या मुद्द्यावरून गैरसमज
या मुद्द्यावर सगळ्यांचा गैरसमज करण्यात आल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले. “वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळं तयार करतात. द्राक्ष, काजूपासून वाईन तयार होते. अशी अनेक फळं आहेत. आपल्याकडे वाईन पिणाऱ्यांचं प्रमाण अतिशय अल्प आहे. जेवढी वाईन तयार होते, तेवढी आपल्या राज्यात खपत नाही. इतर राज्यांत आणि काही परदेशात निर्यात होते. काही देश पाण्याऐवजी वाईन पितात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण काहींनी जाणीवपूर्वक मद्य राष्ट्र वगैरे म्हणून त्याला महत्त्व दिलं आहे”, असं अजित पवार म्हणाले.
“सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न”
“शेवटी आम्ही सरकारमध्ये काम करत असताना जनतेचं नुकसान होईल वगैरे असं काही करणार नाही. सुविधा देणं वेगळं. मध्य प्रदेशनं घरपोच दारू पोहोचवण्याचे निर्णय घेतले आहेत. त्यांचं त्यांना लखलाभ. आपण निर्णय घेताना त्यात दारू नाही, तर वाईन विक्रीसाठी परवानगी दिली आहे. पण काही लोकांनी व्हिडीओ क्लिप वगैरे काढून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न, सरकारबाबत लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे”, असा देखील दावा अजित पवार यांनी यावेळी बोलताना केला.
“भाजपा देशी नवसारीची दारू प्यायल्याप्रमाणे…” शिवसेनेचा निशाणा, वाईन विक्री निर्णयावरून लगावला टोला!
शिवसेनेकडून खोचक टीका
यासंदर्भात सामना अग्रलेखातून टीका करताना “राज्यातील भाजपा देशी नवसारीची दारू प्यायल्याप्रमाणे बरळू लागला आहे”, असा खोचक टोला शिवसेनेनं लगावला आहे. “वाईन आणि दारू यातला फरक विरोधी पक्षाला चांगलाच माहिती आहे. तरीही महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला वाईन चढली आहे व ते सरकारच्या विरोधात बोंब मारीत आहेत”, असं देखील यात म्हटलं आहे.