उपमुख्यमंत्री अजित यांनी वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अनुदानाच्या मुद्द्यावरुन सुरु असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष असणाऱ्या भाजपाकडून केल्या जाणाऱ्या टीकेला उत्तर दिलं आहे. जीएसटी अनुदानाची ८६,९१२ कोटींची रक्कम  केंद्र सरकारने मंगळवारी राज्यांना वितरित केली. यापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक १४,१४५ कोटी रुपये आले आहेत. राज्याची २६,५०० कोटींची थकबाकी असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच केला होता. यानुसार अद्यापही १२ हजार कोटींची राज्याची थकबाकी केंद्राकडे कायम आहे. तर राज्यांची नुकसानभरपाईची सर्व रक्कम वितरित केल्याचा दावा केंद्राने केला आहे.

केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या या आकडेवारीवरुन आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणावरुन प्रतिक्रिया देताना ५० टक्के पैसे अद्याप केंद्राकडे शिल्लक असल्याचं म्हटलंय. याचवरुन भाजपाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. या टीकेला आता उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय.

“केंद्राकडून काल जीएसटीचे १४ हजार १५० कोटी रुपये मिळालेले आहेत. अजून १५ हजार कोटी रुपये राहिलेले आहेत. ते पण मिळवण्यासाठी आमचा पाठपुरवठा सुरु आहे,” असं अजित पवारांनी या निधीसंदर्भात पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना बुधवारी सांगितलं. तसेच या विषयावरुन राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या मंत्र्यांकडूनही नाराजीचा सूर व्यक्त करण्यात आला. याचसंदर्भात बोलताना मुनगंटीवार फक्त महाराष्ट्राचा जीएसटी थांबला आहे का? इतर राज्यांचे मुख्यमंत्री रडताना पाहिलेत का?, असा प्रश्न उपस्थित केला.

ठाकरे सरकार रडत असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केल्याचा संदर्भ देत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी संतापलेल्या स्वरामध्ये, “मी कधी रडलो? कधी माझ्या डोळ्यातून पाणी आलं?” असा प्रश्न विचारला. पुढे बोलताना, दोन वर्ष पैसे आले नाहीत तरी मी रडलो नाही. तसेच याला रडणे नाही तर वस्तुस्थिती लक्षात आणून देणं म्हणतात, असा टोलाही अजित पवारांनी लागवला. दोन वर्ष राज्य सरकार चालवताना अडचण आली तशी केंद्रावरही आली. आर्थिक अडचण सर्वांना आली, हे समजून घेतलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.

Story img Loader