विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या आरोप-प्रत्यारोपांसोबतच एकमेकांना चिमटे काढणे, खोचक टोलेबाजी करणे अशा गोष्टी देखील अधिवेशनात पाहायला मिळत आहेत. एरवी नेतेमंडळींनी सभागृहात लगावलेल्या टोल्यांमुळे हशा पिकत असताना खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एका मुद्द्यावरील चर्चेत बोलताना केलेल्या विधानामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नेमकं झालं काय?
मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत बोलताना आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. “तुमचा सगळा प्रवास मला माहीत आहे, देवेंद्र फडणवीस यांनी एकदा दया, माया, करुणा दाखविली पण परत परत दाखविता येणार नाही”, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी मुंडेंना टोला लगावला होता.
दरम्यान, या प्रकरणावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतलं असून विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. बोलताना मर्यादा पाळायला हवी, अशा शब्दांत अजित पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच सुनावलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार यांनी मंगळवारी सकाळी माध्यमांशी बोलताना या विधानावर आपली भूमिका स्पष्ट केली. “आरोप-प्रत्यारोप होतच असतात. आम्ही आमची भूमिका मांडतो, सत्ताधारी पक्ष त्यांची भूमिका मांडतात. फक्त माझं मत आहे की वैयक्तिक निंदा-नालस्ती कधीच कुणी कुणाची करू नये. महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती, परंपरा आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामाचा एक दर्जा आहे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
फडणवीस यांनी एकदा ‘करुणा’ दाखविली, पुन्हा नाही! ; मुख्यमंत्री शिंदे यांचा धनंजय मुंडे यांना इशारा
“इतर राज्यांमध्ये वेडेवाकडे प्रकार सभागृहात झालेले आपल्याला पाहायला मिळतात. खुर्च्या उचलणं किंवा काही ठिकाणी मारामारीही झाली आहे. पण अशा प्रकारच्या घटना आपण आपल्याकडे होऊ देत नाही. कारण सुरुवातीपासून वडीलधाऱ्यांपासून चालत आलेली परंपरा पुढेची चालत राहावी असं आम्हाला वाटतं”, असं विरोधी पक्षनेत्यांनी नमूद केलं.
“कधीकधी समोरून प्रतिसाद मिळाला तर…”
“आम्ही सभागृहात जागृत राहून काम करत असतो. काही जण बोलता बोलता समोरून प्रतिसाद मिळाला तर एखादा शब्द त्यांच्या तोंडून जातो. पण प्रत्येकानं बोलताना एक मर्यादा ठेवायला हवी. आपल्याकडून काही चूक होऊ देता कामा नये”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.