राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून (सोमवार) नागुपरात सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज (रविवार) महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकारपरिषदही झाली. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. अजित पवारांनी यावेळी सीमाप्रश्न, महापुरुषांचा होणारा अपमान, महाराष्ट्राबाहेर गेलेले उद्योगधंदे आदी मुद्यांवर राज्य सरकारवर टीकास्र सोडलं.
या पत्रकार परिषदेदरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारला असता, अजित पवारांनी स्पष्टपणे उत्तर देणं टाळलं आहे.
हेही वाचा- …म्हणून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस मुख्यमंत्र्यांकडून आयोजित चहापानावर विरोधकांचा बहिष्कार!
संबंधित प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “आपण आता डिसेंबर २०२२ मध्ये आहोत. तुम्ही २०२४ च्या निवडणुकीबाबत प्रश्न विचारत आहात. आम्ही काल सगळ्यांनी एकत्र येऊन महामोर्चा काढला होता. सध्या आमचा प्रयत्न आहे की, आमची एकजूट टिकवायची आहे. त्यासाठी आमचे वरिष्ठ नेते आणि आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. एकत्रित राहण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. पण २०१४ ला काय होईल? हे सांगायला आम्ही ज्योतिषींकडे जात नाही. तसेच आम्ही ज्योतिषींकडे जाऊन भविष्यही बघत नाही. आमचा मंगळ किंवा गुरू काय सांगतोय, हेही आम्ही जाणून घेत नाही,” असा टोला अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.