राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात आज २०२३-२४ सालासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी वर्ग, अंगणवाडी सेविका, महिला, शिक्षण क्षेत्र अशा विविध बाबींसाठी तरतूद केल्याची घोषणा फडणवीसांनी केली. अर्थसंकल्पातील ‘पंचामृत’ सादर केल्यानंतर त्यावर आता विरोधकांनी टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला असल्याचं सांगत अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना त्यांनीच मुख्यमंत्री असताना सात वर्षांपूर्वी केलेल्या एका घोषणेची आठवण करून दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
“चुनावी जुमला, दृरदृष्टीचा अभाव असा हा अर्थसंकल्प आहे. स्वप्नांचे इमले आणि शब्दांचे फुलोरे, घोषणांचा सुकाळ असा हा अर्थसंकल्प आहे”, असं अजित पवार म्हणाले. “अर्थसंकल्पात आमच्या पंचसूत्रीप्रमाणे बऱ्याच बाबी मागच्या अर्थसंकल्पात होत्या. हिंजेवाडी शिवाजीनगर मेट्रो, रिंगरोड, रेवस ते रेड्डी हा मार्ग असेल किंवा विरार ते रायगड, स्वारगेट ते कात्रज, निगडी ते पिंपरी यावर पुन्हा घोषणा करण्यात आल्या आहेत. पुरंदरचं विमानतळ आम्ही करणार अशी घोषणा केली. पण म्हणजे काय करणार? ते सांगितलं नाही”, असंही अजित पवार म्हणाले.
कल्याण-डोंबिवलीसाठीच्या घोषणेचा उल्लेख!
२०१५ साली देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कल्याण-डोंबिवलीसाठी तब्बल ६ हजार ५०० कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्यावर अजित पवारांनी टोला लगावला आहे. “कल्याण-डोंबिवलीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साडेसहा हजार कोटींची घोषणा केली होती. त्यातली एक दमडीही आत्तापर्यंत मिळालेली नाही. त्याचप्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना शेतपंपाच्या वीजमाफीची घोषणा त्यांनीच केली होती. पण त्याचा साधा उल्लेखही नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीसांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या तरतुदी? वाचा सविस्तर!
नेमकी काय होती फडणवीसांची घोषणा?
४ ऑक्टोबर २०१५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या विकास परिषदेत कल्याण-डोंबिवलीसाठी मोठी घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुका होणार होत्या. या पार्श्वभूमवीर फडणवीसांनी केलेल्या या घोषणेची मोठी चर्चा झाली होती. विशेष म्हणजे ही घोषणा करताना फडणवीसांनी कुठेही तेव्हा सत्तेत सोबत असलेल्या शिवसेनेचा उल्लेख केला नव्हता. तसेच, पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचीही घोषणा फडणवीसांनी केली होती. त्यामुळे युती तुटण्याचे संकेतच या घोषणेतून फडणवीसांनी दिल्याचं बोललं जात होतं.
वाचा सविस्तर – कल्याण-डोंबिवलीला ६५०० कोटींचे ‘पॅकेज’!
कल्याणसाठी ६५०० कोटींची घोषणा
फडणवीसांनी तेव्हा कल्याण-डोंबिवलीसाठी ६५०० कोटींची घोषणा केली होती. त्यामध्ये “कचऱ्यापासून वीज, खत, सांडपाण्याचा पुनर्वापर, अतिक्रमणे रोखण्यासाठी उपग्रह दूरस्थ प्रणालीचा वापर, झोपडीधारकांना घरे, नागरी सुविधा, मानीव अभिहस्तांतरणाचे प्रश्न, ‘अॅप’च्या माध्यमातून नागरी सेवा देऊन शहर सेवा-सुविधांनी परिपूर्ण केले जाईल. या सुविधा देताना लोकांवर कोणत्याही प्रकारचा कराचा बोजा टाकला जाणार नाही. २७ गावांमध्ये विकास केंद्र विकसित करून मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्माण केला जाणार आहे. या सर्व सुविधांसाठी ६ हजार ५०० कोटींच्या निधी देण्यात येणार आहे. या निधीतील एक पैसा कोठे मुरणार नाही. प्रत्येक पैशाचा जनतेला हिशेब दिला जाईल. इच्छाशक्तीची कमतरता आड येऊ न देता, येत्या पाच वर्षांत कल्याण डोंबिवली ‘स्मार्ट’बरोबर ‘सेफ सिटी’ केली जाईल. पाच वर्षांनंतर फक्त घोषणा करण्यासाठी नव्हे तर सुंदर नगरी केली म्हणून आपल्या टाळ्या घेण्यासाठी येईन”, असं देवेंद्र फडणवीस तेव्हा म्हणाले होते. याच घोषणेची आठवण अजित पवारांनी आज फडणवीसांना करून दिली आहे.