एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची एकही संधी सोडली जात नसताना सत्ताधारी मंत्र्यांची विधानं किंवा काही कृती विरोधकांच्या हाती आयतंच कोलीत देत असल्याचं बोललं जात आहे. मग ते सदा सरवणकर यांनी दादरमध्ये हवेत झाडलेली गोळी असो किंवा मग काही मत्र्यांकडून अधिकाऱ्यांच्याच कानशिलात लगावण्याचे प्रकार असोत. या सगळ्या राजकीय घडामोडींवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला दिला आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गेल्या दोन दिवसांपासून दोन सत्ताधारी आमदारांमध्ये ‘खोके घेतले की नाही’ यावरून तुफान वाद सुरू आहे. तर दुसरीकडे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा एक व्हिडीओ चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. बीड दौऱ्यावर असताना अब्दुल सत्तारांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांनाच ‘दारू पिता का?’, असा प्रश्न विचारल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावरून वाद सुरू झाला आहे. या सर्व प्रकारांवर अजित पवारांनी टीकास्र सोडलं आहे.
“महाराष्ट्रात असं कधी बघितलं नव्हतं”
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये ‘खोके’वरून सुरू असलेल्या वादाचा संदर्भ यावेळी अजित पवारांनी दिला. “सध्या सत्ताधारी पक्षाचे आमदार एकमेकांवर आरोप करतायत. खोक्यांचा उल्लेख करत आहेत. चौकशांची मागणी करत आहे. आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात असं काही घडलं नाही. मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असायला हवा. इथे मंत्रीच जिल्हाधिकाऱ्यांना विचारतायत की ‘तुम्ही दारू पिता का?’ महाराष्ट्रात असं कधीच बघितलं नव्हतं”, असं अजित पवार म्हणाले.
“छोटा पप्पू आत्ता जे बोलतोय, ते…”, आदित्य ठाकरेंना अब्दुल सत्तारांचा खोचक टोला!
“१०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’चं गाजर दाखवलं. तेव्हाही मी म्हटलं की अजून शिधा पोहोचला नाही. शिधाच्या पिशव्यांवर आमदारांनी स्वत:चे फोटो छापून हौस भागवून घेतली. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांशिवाय कुणाचाही फोटो छापायचा नाही असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. इथे त्याचं उल्लंघन झालंय का हे पाहायला हवं”, असा मुद्दा अजित पवारांनी यावेळी उपस्थित केला.
“मंत्र्यांना मार्गदर्शन करा”
दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी मंत्र्यांना मार्गदर्शन करायला हवं, असं अजित पवार यावेळी म्हणाले. “त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना जरा मार्गदर्शन करावं की कशापद्धतीने आणि काय विधानं केली पाहिजेत. आज महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचं ते प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांची अशी वक्तव्य आल्यानंतर सर्वसामान्य जनतेनं कुणाकडे अपेक्षेनं पाहावं? यासंदर्भात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करावी”, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.