विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे ओळखले जातात. अनेकदा ते इतर आमदारांनी केलेल्या चुकांवर नाराजी व्यक्त करतात. तसेच प्रशासनालाही त्यांच्या चुकांवरून ऐकवायला कमी करत नाहीत. असाच एक प्रकार आज विधानसभेत घडला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून टायपिंग करताना झालेल्या चुकीवर चांगलेच खडसावले. अधिकारी हे फुकट काम करत नसून त्यांना सातवा वेतन आयोग मिळतो, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

हेही वाचा – “…तर हे सरकार अमान्य ठरू शकतं” सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विधान

नेमकं काय घडलं?

विधानसभेत आज (मंगळवारी) लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना लक्षवेधी क्रमांक दोन मध्ये अधिकाऱ्यांकडून विधानसभेऐवजी विधानपरिषद असं लिहीण्यात आलं. यावरून यावरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. ”आपण सर्वच इथे रात्रीपर्यंत काम करतो. मात्र, आता दुसऱ्या लक्षवेधीकडे बघितलं तर यात ‘महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०१ अन्वये लक्षवेधी सुचना’ असे लिहिले आहे. आपण विधानसभेत काम करतो, विधानपरिषदेत नाही, ही ज्याची कोणीची चूक आहे, त्याने यावर दिलगीरी व्यक्त करावी, तुम्ही फुकट काम करत नाही, यासाठी तुम्हाला सरकार सातवा वेतन आयोग देते, यापुढे अशी चुक झाल्यास सरकारने त्यांना निलंबित करावे”, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा – Video : “करुणा दाखवली…”, एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांचा आक्षेप; म्हणाले, “बोलताना मर्यादा…”!

यापूर्वी अभिमन्यू पवारांनाही सुनावले

विधानसभेत आपल्याला प्रश्न विचारू दिला नाही, या मुद्द्यावरून अभिमन्यू पवार संताप व्यक्त करत होते. त्यांनी थेट तालिका अध्यक्षांनाच जाब विचारायला सुरुवात केल्यामुळे अजित पवारांचा संताप झाला. “मला का बोलू दिलं नाही? मी काय वाईट केलंय तुमचं? मी सकाळी सकाळी आंघोळ करून एवढ्या सकाळी आलो. मला का बोलू दिलं नाही एवढं सांगा”, असं अभिमन्यू पवार बोलत होते. अभिमन्यू पवार यांचा आवाज चढताच त्यांना समज देण्यासाठी लागलीच अजित पवार उभे राहिले. “अभिमन्यू पवारांना विनंती आहे की असं तालिका अध्यक्षांना धमकावू नका. तुम्ही एकेकाळी सरकारमध्ये कामं केली आहेत. तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही. तुमच्यावर अन्याय झाला असेल, पण तुम्ही वेगळी आयुधं वापरा. अशा पद्धतीने कुणालातरी धमकावणं योग्य नाही”, असं अजित पवार म्हणाले.

Story img Loader