राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या सडेतोड आणि हजरजबाबी स्वभावासाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांच्या अशा विधानांमुळे ते अडचणीतही सापडले आहेत. असंच एक विधान त्यांनी मंगळवारी राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनादरम्यान केल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. हे प्रकरण एवढं वाढलं की अखेर दुसऱ्या दिवशी त्यांना या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त करावी लागली. मात्र, त्यावरून अजित पवारांना लक्ष्य करण्याची एकही संधी विरोधकांकडून सोडली जात नसताना अजित पवारांनी त्यासंदर्भात भूमिका मांडली आहे.
नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?
मंगळवारी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सारथी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या फेलोशिपचा मुद्दा सतेज पाटील यांनी उपस्थित केला. मात्र, त्यावर बोलताना अजित पवारांनी “हे विद्यार्थी फेलोशिप घेऊन काय करणार आहेत? पीएचडी करून काय दिवा लावणार आहेत? या विद्यार्थ्यांनी फेलोशिपऐवजी एमपीएससीसह आयएएस, आयपीएस, आयआरएस अशा इतर स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करायला हवेत”, असं विधान केल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. अखेर बुधवारी अजित पवारांनी या विधानासाठी दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतरही हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“पुन्हा पुन्हा तेच उकरून काढू नका”
वारंवार तोच मुद्दा उपस्थित करू नका, असं अजित पवारांनी यावेळी माध्यमांना सांगितलं. “मी मागेच सांगितलं. पुन्हा पुन्हा ते उकरून काढू नका. त्यात फक्त काय दिवे लावणार हे शब्द गेले. ते शब्दही सभागृहात रेकॉर्डला आलेले नाही. मी ते बसून बोललो की उभं राहून हे मला आठवत नाहीये. पण रेकॉर्डला हा शब्दच आलेला नाही. तरीही मी दिलगिरी व्यक्त केली. त्याबाबत मी माझी भूमिका स्पष्ट मांडली”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
“एखादा शब्द वेगळा गेला तर मी त्यावर दिलगिरी व्यक्त करून विषय संपवतो”
“माझे विरोधक त्या गोष्टीचा बाऊ करण्याचा प्रयत्न करणारच. त्यात काही आकाश-पाताळ एक झालेलं नाहीये. त्यात कुठला अपशब्द होता असंही नाहीये. माझ्यादृष्टीने मी तो विषय संपवलेला आहे. पण माझ्या विरोधकांना काही ना काही मुद्दा हवाच असतो. अधिवेशन चालू झाल्यानंतर त्या विषयाला इतकं वर नेण्याचा प्रयत्न केला, की त्यावर न बोललेलंच बरं. मला त्या गोष्टीला महत्त्व द्यायचं नाही. आपली परंपरा आहे. एखादा शब्द वेगळा गेला, तर आपण त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि विषय संपवतो”, असं अजित पवार म्हणाले.
अमित शाहांबरोबरची बैठक ऐन वेळी पुढे ढकलली; कारण सांगताना अजित पवार म्हणाले, “रात्री आम्हाला…”
अधिवेशन संपण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा?
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा होईल, असं अजित पवारांनी सांगितलं आहे. “अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अधिवेशन संपण्याच्या आत विशेष पॅकेज जाहीर केलं जाईल. मुख्यमंत्री याची घोषणा करतील. यासंदर्भातलं नियोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री यासंदर्भात अधिकची माहिती घेत आहेत. मला विश्वास आहे की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. शेतकरी केंद्रबिंदू मानून मदत करण्याची भूमिका सरकारची राहणार आहे. ती जाहीर केल्यानंतर सगळ्यांना कळेलच”, असं अजित पवार म्हणाले.