गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असल्याचं दिसत आहे. जालन्यात आधी मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलन आणि त्यावर झालेला लाठीहल्ला या मुद्द्यांवरून मोठा वाद निर्माण झाला. दुसरीकडे मनोज जरंगे पाटील यांनी या मागणीसाठी उपोषण सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज्य सरकारवर सातत्याने आगपाखड सुरू केली आहे. पोलिसांनी राज्य सरकारच्या आदेशानं लाठीहल्ला केला, असा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर आता राज्य सरकारकडून सविस्तर पत्रकार परिषद घेण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना खुलं आव्हान दिलं आहे.
मनोज जरंगेंना आश्वासन
राज्य सरकारच्या वतीने या पत्रकार परिषदेत मनोज जरंगे पाटील यांच्या मागण्यांचा सरकार गांभीर्यानं विचार करत असल्याचं स्पष्ट केलं. तसेच, यासंदर्भातल्या समितीच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचंही आश्वासन सरकारच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिलं. यावेळी बोलताना अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना सुनावलं आहे.
“घराबाहेर न पडल्यामुळे गैरसमज”
गेल्या गोन दिवसांपासून अजित पवार घराबाहेर न पडल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं. “दोन दिवस आजारी होतो. त्यामुळे बाहेर पडता आलं नाही. त्यावरून अनेक समज-गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. जालन्यात जी घटना घडली, जो लाठीचार्ज झाला त्याबद्दल सगळ्यांनी त्याबाबतचा विरोध दर्शवला. असं व्हायला नको होतं. आमची सगळ्यांची तशीच भूमिका आहे”, असं अजित पवार म्हणाले.
“असे प्रसंग येतात तेव्हा सर्वांनी राज्याचं हित डोळ्यांसमोर घेऊन भूमिका घ्यायला हवी. पण दुर्दैवाने त्यात राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेकांना अनेक वेळा वेगवेगळ्या पदांवर संधी मिळाली. त्यांनी त्या त्या वेळी वेगवेगळ्या समाजघटकांना आरक्षणासंदर्भात भूमिका घेतली. पण कायद्याच्या चौकटीतही तो प्रयत्न बसला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयातही तो मान्य व्हायला हवा. सर्वोच्च न्यायालय वेगवेगळे निर्णय देतं. त्याही वेळी तिथे अडचण येता कामा नये”, असं अजित पवारांनी नमूद केलं.
“तो अदृश्य फोन कॉल…”, जालना लाठीहल्ला प्रकरणी संजय राऊतांचा सवाल; म्हणाले, “राज्यात तीन जनरल डायर…!”
“१० कोटी रुपयांच्या बसेस जाळल्या”
“मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आवाहन करतो.. जाळपोळ, बंद वगैरे राज्याचंच आहे. १० कोटी रुपयांच्या एसटी बसेस जाळल्या. हे नुकसान राज्याचंच आहे. मागच्या काळात मराठा समाजानं शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन केलं. पण आत्ता त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. अतिशय सकारात्मक चर्चा आत्ताच्या बैठकीत झाली. उदयनराजे भोसलेही तिथे होते”, असं अजित पवार म्हणाले.
“विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न चालू”
“आम्ही तिघांपैकी कुणी तसे आदेश दिले असतील तर राजकारणातून बाजूला होईन. पण तसं सिद्ध नाही झालं, तर त्यांनी राजकारणातून बाजूला व्हावं. आहे का हिंमत? काहीजण जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण खुशाल सांगतात की वरून आदेश आल्यानंतर हे घडलं. मी सांगतो, वरून आदेश आले असं सिद्ध करून दाखवलं तर आम्ही म्हणाल ते हरू. पण उगीच शंका, गैरसमज निर्माण करायचे, समाजात अस्वस्थता निर्माण करायची आणि त्यातून काही साध्य करता येतं का असा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. तो महाराष्ट्राला परवडणारा नाही. महाराष्ट्र सुसंस्कृत आहे याची जाणीव सगळ्यांनी ठेवायला हवी”, अशा शब्दांत अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं.
“शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण इतरांना त्रास होईल असं काही करू नये. आज तलाठी परीक्षा होत्या. पण मुलांना बसेस बंद असल्यामुळे अनेक भागात परीक्षा केंद्रांवर पोहोचता आलं नाही”, असं आवाहनही अजित पवारांनी यावेळी केलं.