Ajit Pawar on Sanjay Raut: गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांबाबत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये आपण वेश बदलून दिल्लीत गेल्याचं सांगितल्याचं वृत्ता काही माध्यमांमध्ये आल्यानंतर त्यावरून तर्क-वितर्कांना सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीआधी या भेटीगाठी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. यासंदर्भात आज नाशिक दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवारांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, यावेळी त्यांनी विरोधी पक्षांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकी चर्चा काय?
राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून सत्ताधारी महायुतीत जाण्यापूर्वी त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अजित पवार दिल्लीला १० वेळा गेल्याचा दावा करण्यात आला. त्यापाठोपाठ अजित पवार प्रत्येकवेळी वेश बदलून दिल्लीला जायचे, विमानातही त्यांनी त्यांची ओळख लपवून ए. ए. पवार असं नाव सांगितलं अशी चर्चाही सुरू झाली. यावरून विरोधकांनी अजित पवारांना लक्ष्य करायला सुरुवात केली. अनेकांनी अजित पवारांच्या या भेटीगाठींवर परखड भाष्यही केलं. या सर्व पार्श्वभूमीवर आता अजित पवारांनी त्यांची ठाम भूमिका मांडली आहे.
“काहींनी पार अधिवेशनाच्या शून्य प्रहरात मुद्दा मांडला”
“मी गेल्या ५-६ दिवसांपासून बघतोय. काही राजकीय लोकांनी त्यावर वक्तव्यंही केली आहेत की अजित पवारांनी जो निर्णय घेतला, त्यासाठी अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे. धादांत खोटं आहे. मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो की हे बदनामी करण्याचं काम चालू आहे. माझ्याबाबत गैरसमज करण्याचं काम चालू आहे. काहींनी पार अधिवेशनात शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. अजित पवार नाव बदलून गेले म्हणे”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
“मी ३५ वर्षं राजकीय जीवनात कार्यरत आहे. खासदार, आमदार, राज्यमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री अशी अनेक पदं मी सांभाळली आहेत. एक जबाबदारी मलाही कळते. एखाद्यानं नाव बदलून जाणं हा गुन्हा आहे. सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. खुशाल काहीही बोललं जातंय. कोण बहुरुपी म्हणतंय, कोण काय म्हणतंय.. म्हणणाऱ्यांना लाज, लज्जा, शरम वाटली पाहिजे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत”, अशा शब्दांत अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे.
संजय राऊतांवरही घेतलं तोंडसुख!
दरम्यान, यावेळी अजित पवारांनी ‘सकाळचा ९ चा भोंगा’ असं म्हणून संजय राऊतांवरही अप्रत्यक्षपणे टीका केली. “सकाळचा ९ चा भोंगा लागतो त्यांनीही लगेच टीका करायला सुरुवात केली. अरे काय केलं? उगीच उचलली जीभ, लावली टाळ्याला असं चाललंय. तुम्हाला कुठे पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदलून प्रवास केला? मी तेव्हा विरोधी पक्षनेता होतो. मला समाज ओळखतो. कुणी म्हटलं मिशा लावल्या होत्या, टोपी घातली होती, मास्क घातलं होतं. साफ चुकीचं आहे”, असं अजित पवार म्हणाले.
“अजित पवार अमित शाहांना चोरून का भेटत होते?”, खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल
“माझ्या बदनामीसाठीच हे चाललंय”
“जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणातून निवृत्त होईन. जर सिद्ध झालं नाही, तर ज्या लोकांनी पार संसदेपासून इथपर्यंयत ही नौटंकी चालवली आहे, त्यांना जनाची नाही, मनाची लाज वाटायला हवी. उगीच कुणीतरी एखादं चॅनल बातमी लावतं. त्या बातमीचा कुठेही आधार नाही, पुरावा नाही. कॅमेऱ्यात तसं काही दृश्यही नाही. फक्त माझी बदनामी करण्यासाठी केलं जात आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.
“मला सगळ्यांना विचारायचंय की तुम्ही मला कुठे बघितलं? म्हणे १० वेळा दिल्लीत जाऊन भेटलो. मी लोकशाहीत काम करतो. मला कुठे जायचं असेल तर मी उजळ माथ्याने जाईन. मला लपून-छपून जायची गरज नाही. बातम्या माध्यमांमधून छापून आणायच्या आणि त्यानंतर विरोधकांनी ठरवून अपप्रचार करायचा असं केलं जात आहे. त्यासंदर्भात आलेल्या एकाही बातमीत तसूभरही तथ्य नाही. माझं संसदेलाही आव्हान आहे. तपासून पाहावं. खरं असेल तर अजित पवार राजकारणातून बाजूला होईल. खरं नसेल, तर तर ज्यांनी संसदेत कोणताही पुरावा नसताना, खरी माहिती जाणून न घेता आरोप केले, त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा”, असं आव्हानही अजित पवारांनी टीकाकारांना दिलं आहे.