मी एकदा मुंबईत बघत होतो की एक हेलिकॉप्टर सारखं मुंबईवर घिरट्या घालत होतं. मला हे कळेना की सारखं का हेलिकॉप्टर फिरतं आहे. मग मी चौकशी केली तेव्हा मला कळलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते पाठवलं होतं. पुढच्या वर्षी पंतप्रधान मोदींना दहा वर्षे होतील. दहा वर्षात आपण कुठे कुठे काय काय कामं केली? कुठे भूमिपूजन केलं हे बघण्यासाठी खास ते हेलिकॉप्टर पाठवण्यात आलं होतं. दहादा समुद्रात ते हेलिकॉप्टर शिवस्मारक शोधत होतं. अशी काय लाट आली? अशी काय त्सुनामी आली की शिवस्मारक गायब झालं? ते तिकडे अहवाल द्यायचे की स्मारक नाही. तर तिकडून सांगितलं जायचं असं कसं स्मारक नाही? नीट बघा सापडत कसं नाही. महाराजांचं स्मारक काही सापडलं नाही असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.
अजित पवार पुढे म्हणाले की युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो लावून २०१४ ला मतं घेतली. मतं घेण्यासाठी तुम्हाला शिवाजी महाराज आठवतात. स्मारकाची घोषणा, जलपूजन घाईने का केलं कारण तुम्हाला मतं मिळवायची होती. तुम्हालाही माहित आहे की ३५० वर्षे झाली छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतलं की उभा महाराष्ट्र नतमस्तक होतो. हे सगळं समोर ठेवूनच तुम्ही करत आहात. पाच वर्षात शिवस्मारक का झालं नाही? असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला.
शिवस्मारकच नाही तर इंदू मिलमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचाही उल्लेख आला नाही. तसंच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचाही विसर पडला असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
राजकीय पक्षात काम करत असताना आपण काय करत असतो? आपलं सरकार चांगलं आहे का हे सांगण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असतात. आठ महिन्यांपूर्वी हे सरकार अस्तित्त्वात आलं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपधविधी झाला. भाजपाच्या प्रत्येक आमदाराला पहिला झटका लागला होता. त्यांच्यासोबत जे भाजपाचे आमदार होते त्यांना सगळ्यांना खात्री होती की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार. त्यावेळी राज्यपाल असलेल्या कोश्यारींनाही मी भेटलो तर तेदेखील म्हणाले की ये कैसे हो गया! असं वाक्य माझ्या कानी आलं. आधी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच म्हटलं होतं की मी मंत्रिमंडळात जाणार नाही असं म्हणत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सभागृहात टोला लगावला.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हटल्यावर कुणाकुणाच्या डोळ्यात पाणी आलं गिरीश महाजन यांना माहित आहे. ८०-८५ आमदार आहोत आपण काय बंड करायचं का? असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांची समजूत काढली. सुरूवातीचे कितीतरी दिवस दोघंच मंत्री होते. त्यानंतर कसबसा विस्तार झाला. पण पूर्ण विस्तार अजूनही झालेला नाही. दिल्लीहून आदेश आले की हे काम करतात ही यांची परिस्थिती आहे. गेल्या महिन्यात पदवीधर निवडणुका झाल्या. जे शिक्षक पुढची पिढी घडवतात त्यांनी मतदान केलं. त्या निवडणुकीत चपराक बसली आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.