नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज राज्याच्या विधीमंडळात सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पानुसार राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत. कृषीसह इतर अनेक क्षेत्रांचाही विचार करण्यात आला आहे. दरम्यान, ज्या गोष्टींचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आलेला नाही त्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, विधीमंडळात केवळ युगपुरूष छत्रपती शिवाजी माहाराजांच्या नावाने घोषणा देण्याचं काम सुरू होतं. पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं. पण त्याचं पुढे काय झालं, त्यासाठी किती निधी दिला, या स्मारकाचं काम कधी सुरू होणार, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
हे ही वाचा >> ‘फडणवीसांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला’; ‘त्या’ सवालावरून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
विकासकामांसाठी कोणताही नवीन निधी नाही : पवार
केवळ बोलणाऱ्याच्या तोंडाला आणि ऐकणाऱ्याच्या कानाला बरं वाटेल अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून आपण हेच पाहतोय. आज त्याची पुनरावृत्ती झाली. आम्ही (महाविकास आघाडीने) विकासाठी पंचसुत्री मांडली, यांनी विकासाचं पंचामृत आणलं आहे. या सरकारने लोकांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत फिरवण्याचं काम केलं आहे. परंतु निवडणुकीआधी केलेल्या घोषणाचं काय झालं हे काही कळलं नाही. तसेच विकासकामांना कोणताही नवीन निधी देण्यात आलेला नाही. तसेच या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली आहे.