अर्थमंत्री अजित पवार हे त्यांच्या मिश्किल स्वभावासाठी परिचित आहेत. राजकीय मुद्दा असो किंवा राष्ट्रीय, अजित पवारांची विधानं चर्चेत राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. आज महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अजित पवारांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देणारं भाषण केलं. या भाषणात त्यांनी विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतलाच. पण त्याचवेळी टोलेबाजी आणि शेरोशायरीच्या माध्यमातून विरोधकांना राजकीय चिमटे काढायलाही ते विसरले नाहीत. त्यांच्या विधानांवर सभागृहातील सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांकडून दिलखुलास हसत दाद दिली जात होती.

“मी दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय”

“काही सदस्यांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं. मी सगळ्यांनाच धन्यवाद देतो. तुम्ही केलेल्या सूचनांची आम्ही नोंद घेतली आहे. काही सदस्यांनी आर्थिक स्थितीच्या बाबतीत मुद्दा उपस्थित केला. महसूल, राजकोषीय तूट, कर्जाचा बोजा यावर चर्चा केली. मला सभागृहाला सांगायचंय की इथे आजपर्यंत जयंत पाटलांचं एक रेकॉर्ड होतं ९ वेळा अर्थसंकल्प मांडायचं. पण मला दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडायची संधी देण्यात आली आहे. आम्हालाही थोडाफार अनुभव आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी विरोधी पक्षांकडून करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

जयंत पाटलांची कोपरखळी आणि अजित पवारांचा टोला!

दरम्यान, यावेळी अजित पवार आणि विरोधी पक्षाच्या काही सदस्यांमध्ये टोल्यांची जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. अजि पवारांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडल्याचं सांगताना विरोधकांना मिश्किल शब्दांत लक्ष्य करताच समोरच्या बाजूला बसलेले शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि अजित पवार यांचे पूर्वाश्रमीचे पक्षातील सहकारी जयंत पाटील यांनी अजित पवारांना मूडवरून कोपरखळी मारली. “आज काय वेगळा मूड आहे का?” असं जयंत पाटील म्हणताच अजित पवारांनीही त्याच स्टाईलमध्ये टोला लगावला.

Video: अजित पवारांचं उत्तर वडेट्टीवारांना, पण रोख शरद पवारांवर? अर्थसंकल्प फुटल्याचा केला होता आरोप; म्हणाले, “मी स्पष्टच सांगतो…”

“काय करणार? मोठी जबाबदारी वाढली की मूड बदलावा लागतो. कुणाच्या हाताखाली काम करत असताना सगळं तिथे ढकलावं लागतं. त्यांनी केलं, मी कुठे काही केलं? असं म्हणावं लागतं”, असं अजित पवारांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

“दोन्ही बाजूंनी अर्थसंकल्पावरची टीका पाहिली”

दरम्यान, आपल्या अर्थसंकल्पावर दोन्ही बाजूच्या सदस्यांची टीका पाहिल्याचं अजित पवारांनी नमूद केलं. “मला दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली. आम्हाला इतरांइतका अनुभव नसेल. पण थोडाफार अनुभव आहे. महाविकास आघाडी आणि आता महायुतीतही अर्थसंकल्प मांडण्याची संधी दिली आहे. पण एक गोष्ट मी पाहिली आहे. मविआकडून अर्थसंकल्प मांडला तेव्हा महायुतीकडून विरोध व्हायचा. आता महायुतीकडून अर्थसंकल्प मांडला, तर मविआकडून विरोध होत आहे. हरकत नाही. तो मनुष्यस्वभाव आहे”, असं ते म्हणाले.

विरोधकांसाठी अजित पवारांची शेरोशायरी!

यावेळी अजित पवारांनी शायरीच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष्य केलं आहे. “विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे लोकशाहीचे दोन स्तंभ आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवारांनी भाषणात काही चांगले मुद्दे मांडले आहेत. त्यांना तितकाच सकारात्मक प्रतिसाद देण्याची आमची भूमिका आहे. त्यासाठी मी काही ओळी म्हणून दाखवतो” असं म्हणत अजित पवारांनी एक शेर वाचून दाखवला.

…प्यार करोगे, तो प्यार करेंगे
हाथ मिलाओगे, तो हाथ भी मिलाएंगे
गले मिलोगे तो गले भी मिलेंगे
सितम करोगे तो सितम करेंगे
हम आदमी है तुम्हारे जैसे
जो तुम करोगे, वो हम करेंगे!

अजित पवारांनी हा शेर वाचताच पुन्हा एकदा समोरून भास्कर जाधव यांनी “आज मूड जरा वेगळा दिसतोय”, असा शेरा मारला. त्यावर “बघा आता चांगला मूड झाला तरी वाईट वाटतंय. कठीणच आहे राव”, अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यावर पुन्हा एकदा सभागृहात हशा पिकला.