काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते अजित पवार गटात प्रवेश करणार असे म्हटले जात होते. त्यावर आता उपमुख्यंमत्री अजित पवार यांनीच थेट भाष्य केले आहे. उद्या दि. १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांचा पक्षप्रवेश होईल, असे अजित पवार म्हणाले आहेत. बाबा सिद्दीकी यांच्याशिवाय ११ फेब्रुवारी रोजीही काही नेते पक्षात प्रवेश घेणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पक्ष, चिन्ह, झेंडा आमच्याकडे आला आहे. त्यामुळे इतर नेत्यांनीही याचा विचार करावा, असा सूचक इशारा अजित पवार यांनी दिला. पूण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हे विधान केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रतिज्ञापत्र देणारे शपथविधीला उपस्थित होते

खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार आणि शरद पवार अशा दोन्ही गटाला प्रतिज्ञापत्र सादर केले होते. माझी दिशाभूल करून प्रतिज्ञापत्र घेतले गेले, असे विधान अमोल कोल्हे यांनी केले होते. यावर प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले की, ते स्वतः शपथविधीला उपस्थित होते. तिथे त्यांनी माध्यमांना बाईटही दिले होते. त्यानंतर त्यांची भूमिका अचानक बदलली, त्याबद्दल आता आम्हाला बोलायचे नाही. पण आमदार – खासदार यांची दिशाभूल करून असे प्रतिज्ञापत्र घेता येत नाही.

“मागेल त्याला बुलेट प्रूफ जॅकेट..”, गोळीबार प्रकरणांवरून जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका

रिल बनविणाऱ्या गुंडाची मस्ती उतरवा

पुण्यातील गुंडांनी रिल्स बनवून सोशल मीडियावर टाकू नये, असे स्पष्ट आदेश पुणे पोलिसांनी दिल्यानंतरही पुण्यातील काही गुंड रिल्स बनवत आहेत. याबाबत पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले की, पुण्यातील पोलीस आयुक्त आणि जिल्हा अधिक्षक यांच्याशी याबाबत चर्चा झालेली आहे. गुंडांना समज देऊनही जर ते व्हिडिओ बनवत असतील तर त्यांची मस्ती पोलिसी खाक्या दाखवूनच नियंत्रणात आणावी लागेल. लोकांच्या मनातून भीती गेली पाहीजे, यासाठी पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केला पाहीजे.

घोसाळकरांवरील गोळीबार दुर्दैवी घटना

“दहिसर येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा घटना महाराष्ट्रात घडताच कामा नये. त्या घटनेत काही मिनिटांचे व्यवस्थित संभाषण सुरू असल्याचे दिसत आहे. घोसाळकर उठत असताना त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे या घटनेचा नीट तपास झाला पाहीजे. या दोघांमध्ये नक्की काय झालं? हे समोर आयला हवं. या घटनेवरून विरोधक मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करत आहेत. राजीनामा मागण्याचा प्रयत्न केला जाईल. पण चौकशीतूनच तथ्य समोर येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चर्चा केलेली आहे. लवकरच सत्य समोर येईल”, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

महाराष्ट्रात मागच्या महिन्याभरात तीन गोळीबाराचे प्रकरण घडले आहेत. मुळशी येथे काही दिवसांपूर्वी गुंड शरद मोहोळ याच्यावर दिवसाढवळ्या त्याच्याच साथीदारांनी गोळ्या झाडल्या. तर उल्हासनगर येथे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला. काल दहिसरमध्येही अशीच घटना घडली. या तीनही घटनांमध्ये आरोपी आणि पीडित हे एकमेकांना ओळखणारे होते. त्यांच्यातील आपसातील वादातून गोळीबार झाला आहे, असे स्पष्टीकरणही अजित पवार यांनी दिले.