AJit Pawar on Chhagan Bhujbal : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी आज सकाळीच फुलेवाड्याला भेट देऊन महात्मा फुलेंना अभिवादन केलं. यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महात्मा फुले यांच्या स्मारकावरून राजकीय वर्तुळात चालू असलेल्या दाव्यांबाबत अजित पवारांनी यावेळी भाष्य केलं.

काय म्हणाले छगन भुजबळ?

महात्मा फुले स्मारकासाठी जागा देण्यावरून सध्या चर्चा चालू असतानाच अजित पवारांच्याच पक्षातील ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी यासंदर्भात परखड भाष्य केलं आहे.

“इथे अनेक लोक आहेत जे स्वत: महात्मा फुलेंच्या स्मारकासाठी जागा द्यायला तयार आहेत. पण अधिकारी त्यांना सांगतात की किती पैसे द्यायचे ते आम्हाला माहिती नाही, प्रक्रिया पूर्ण झाली नाही वगैरे. फक्त टोलवाटोलवी चालू आहे. मी काही उपोषण वगैरे करत बसत नाही. पण आता असं वाटतं की ठीक आहे, शेवटचा उपाय म्हणून बसू उपोषण करायला. मी सरकारमधल्या एका पक्षाचा एक आमदार आहे. त्यामुळे आता इथे उपोषण करायला मी मोकळा आहे. बाकीच्या जबाबदाऱ्या असल्या की जरा अडचण होते”, असं छगन भुजबळ गुरुवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.

अजित पवार म्हणतात, “ती वेळ येणार नाही”

दरम्यान, भुजबळांना उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. “आपण विमानतळ, रेल्वे, शहरीकरणासाठी जागा अधिग्रहित करतो. त्याचे साधारण नियम ठरले आहेत. मी यासंदर्भात भुजबळांशीही बोलेन. अधिकाऱ्यांशीही बोलेन. असं नाहीये. आपल्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत की किती पैसे द्यायचे वगैरे. त्यात काही अडचणी असतील तर आम्ही मंत्रिमंडळासमोर हा विषय मांडून मार्ग काढू. छगन भुजबळांना उपोषणाला बसायची वेळ येणार नाही अशी काळजी घेऊ”, असं अजित पवार पुण्यात म्हणाले.

महात्मा फुलेंवरील चित्रपटाबाबत भूमिका

महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यावर हिंदू महासभेनं आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. “कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्याआधी सेन्सॉर बोर्ड चित्रपट पाहातं. चित्रपटाचा समाजावर विपरीत परिणाम होणार आहे का याची शहानिशा केली जाते. आत्तापर्यंत अनेक चित्रपट आले. तेव्हाही अशी चर्चा झाली. पद्मावतीचं पद्मावत केलं आणि मग तो चित्रपट प्रदर्शित झाला. पण तरी काहीजणांचा त्याला विरोध होता. घटनेनं सगळ्यांना मतस्वातंत्र्य दिलं आहे. त्यानुसार लोक बोलत असतात. पण सरकार म्हणून आम्ही काळजी घ्यायला हवी की त्यातून समाजात कोणतीही तेढ निर्माण होणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.