गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता. अखेर २७ जानेवारी रोजी मराठा आरक्षणासंदर्भातला अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: मनोज जरांगे पाटील यांच्या हातात सोपला. मात्र, यानंतर ओबीसी समाजामध्ये तीव्र विरोधाची भावना निर्माण झाली आहे. ओबीसी नेते व राज्यातील सत्ताधारी अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारविरोधात दंड थोपटले असून मुख्यमंत्र्यांचा निर्णय आपल्याला मान्य नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. यासंदर्भात आता अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

छगन भुजबळ यांनी २८ जानेवारी रोजी माध्यमांशी बोलताना ओबीसी समाजातील व्यक्तींना मराठा आरक्षणासंदर्भातल्या शासकीय अध्यादेशावर अधिकाधिक हरकती सादर करण्याचं आवाहन केलं. तसेच, येत्या ३ फेब्रुवारी रोजी ओबीसी एल्गार मेळाव्याचंही आयोजन करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली आहे. छगन भुजबळ आक्रमक होत असताना अजित पवार यांची त्यावर नेमकी भूमिका काय? याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता अजित पवारांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं.

“सहकाऱ्यांची वेगवेगळी मतं असू शकतात”

“प्रफुल्ल पटेलांनी यासंदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाकडून किंवा सरकारमध्ये काम करत असताना सर्व घटकांना न्याय देता आला पाहिजे. कोणत्याही घटकाला नाराज ठेवून चालत नाही. राज्याच्य प्रमुखांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा आरक्षण देणार असं सांगितलं होतं. गेल्या दोन दिवसांतल्या घडामोडी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेनं पाहिलं आहे. कोणत्याही निर्णयाबाबत वेगवेगळ्या सहकाऱ्यांची वेगवेगळी मतं असतात. आम्ही मुंबईला गेल्यानंतर मी, मुख्यमंत्री, देवेंद्रजी भुजबळांशी बोलू”, असं अजित पवार म्हणाले.

छगन भुजबळांचा गैरसमज?

“प्रत्येकाचे काही समज-गैरसमज असतात. काहीजण ते बोलून दाखवतात. पण यातून कुणालाही दुखवायचं काही कारण नाही. कुणावरही अन्याय करण्याचं कारण नाही. काल मुख्यमंत्री आणि मी एकत्र शंभूराज देसाईंच्या मुलाच्या लग्नाला होतो. तिथेही आमचं बोलणं झालं. रात्री मी मुंबईला मुक्कामाला जाणार आहे. तिथे त्यांच्याशी बोलेन”, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

मोठी बातमी! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी निकाल लांबला, SC कडून विधानसभा अध्यक्षांना मुदतवाढ

“लोकशाहीत प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. एकनाथ शिंदे म्हणालेत की कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार. घरात दोन भाऊ असले तरी त्यांच्यात एखाद्या गोष्टीबाबत मतभेद असतात. याबद्दल देवेंद्रजींनीही नागपुरात सांगितलं की मुंबईत गेल्यावर भुजबळांशी बोलू. मीही तसंच सांगतोय. त्यामुळे किमान त्यांच्याशी बोलण्यापुरतं तरी वेळ द्या मला”, अशी विनंती यावेळी अजित पवारांनी केली.

भुजबळांचं ‘ते’ विधान, अजित पवारांचं स्पष्टीकरण

दरम्यान, भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपलंच सरकार आणि पक्षाविरोधी भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर “मला सोबत घ्यायचं की नाही हे आता सरकारनं आणि माझ्या पक्षानं ठरवावं” असं भुजबळ म्हणाल्याचा उल्लेख पत्रकारांनी केला. त्यावर अजित पवारांनी फक्त “मी घेईन त्याबाबतचा निर्णय, तुम्ही नका काळजी करू”, एवढंच उत्तर देऊन तो विषय तिथेच संपवला.

Live Updates
Story img Loader