Ajit Pawar on Hindi Language Issue: गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी भाषा की मराठी भाषा यावर मोठा राजकीय वाद निर्माण झाल्याचं दिसत आहे. राज्य शालेय अभ्यासक्रम आराकडा २०२४ नुसार आता महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी व इंग्रजीसोबतच हिंदीही सक्तीची करण्यात आली आहे. तिसरी भाषा म्हणून विद्यार्थ्यांना हिंदी शिकावी लागणार आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गदारोळ सुरू झाला आहे. राज ठाकरेंनी याचा निषेध करणारी सविस्तर पोस्ट केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या वादावर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

हिंदीच्या सक्तीमुळे मराठीवर अन्याय होत असल्याचा दावा करणाऱ्या विरोधी पक्षांवर अजित पवारांनी तोंडसुख घेतलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आले असता तिथे माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. राज्यात चालू असलेला हिंदी भाषेचा वाद निरर्थक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

“सध्या यांना कुणाला उद्योग नाहीयेत. मराठी आपली मातृभाषा आहेच. त्याबद्दल कुणाचं दुमत नाही. प्रत्येक राज्याला आपल्या मातृभाषेबाबत आपुलकी, जिव्हाळा, प्रेम असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. खूप वर्षं हे प्रकरण दिल्लीत पडून होतं. पण कुणीही ते करण्याचं धाडस दाखवलं नाही. पण ते एनडीएच्या सरकारनं दाखवलं. आता मरीन ड्राईव्हला अतिशय चांगल्या वास्तूमध्ये मराठी भाषा भवन उभारण्याचं आम्ही ठरवलं आहे. त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता नाही”, असं अजित पवार म्हणाले.

हिंदी सक्तीला समर्थन, पण मराठी आलीच पाहिजे!

“जगात सर्वाधिक बोलली जाते ती इंग्रजी भाषा. पण आपल्या प्रत्येकाच्या घरात नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे. भारतात अनेक राज्यांमध्ये हिंदीही चालतं. काहीजण म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे. पण त्यावरून वाद आहे, मला त्या वादात जायचं नाही. पण ज्यांना सध्या उद्योग नाहीत, ते असले वाद घालत असतात. त्यातच वेळ घालवतात”, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे.

“इंग्रजीही आपल्याला आली पाहिजे. तिन्ही भाषांना महत्त्व आहे. पण शेवटी आपल्या मातृभाषेला पहिल्या क्रमांकाचं स्थान आहे”, असंही ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हिंदी भाषेच्या सक्तीसंदर्भात विरोधकांकडून टीका केली जात असताना त्यावर अजित पवारांनी थेट भाष्य न करता विरोधकांना लक्ष्य केलं. “समोरच्या राजकीय पक्षांकडे कुठला मुद्दा राहिलेला नाही. उन्हाची तीव्रता, उष्माघात, तापमान वाढलंय, पाण्याच्या साठ्यांमधून मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. असे अनेक महत्त्वाचे मुद्दे सध्या राज्यात आहेत”, असं अजित पवारांनी नमूद केलं.

राज ठाकरेंची सविस्तर पोस्ट

दरम्यान, शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यावर सविस्तर पोस्ट लिहीली आहे. “ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का? आणि करून तर बघा, तिथली सरकारेच पेटून उठतील. महाराष्ट्रातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळे खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे. बाकीच्यांचे आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणेघेणे पण नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही”, असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.