राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या कामाच्या धडाक्यामुळे आणि हजरजबाबी स्वभावामुळे सर्वांना परिचित आहेत. मात्र, अजित पवार कधी कोणत्या गोष्टीला घाबरायचे, असं जर कुणी सांगितलं, तर त्यावर सहज विश्वास ठेवणं कठीण होईल. पण हे खुद्द अजित पवारांनीच त्याविषयी एक किस्सा सांगितला आहे. आपल्याला पाण्याची फार भिती वाटायची, असं म्हणत अजित पवारांनी ‘तेव्हापासून आमचे वरीष्ठ आमच्याशी असे वागतात, तरी आम्ही इथपर्यंत पोहोचलो’, असं म्हणत मोठ्या बंधूंना मिश्किल टोलाही लगावला. अजित पवारांनी हा किस्सा सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बारामतीमध्ये अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी दिवाळीचा पहिला दिवस अर्थात वसुबारसच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अध्यक्ष शरद पवार हेही उपस्थित होते. या कार्यक्रमात जलतरण तलाव आणि पोहण्याच्या सवयीविषयी बोलताना अजित पवारांनी आपल्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला.

“डबा बांधून मला वरून…”

लहानपणी आपण पोहायला कसे शिकलो, याविषयी अजित पवारांनी एक आठवण उपस्थितांना सांगितली. “मला आठवतंय बारामतीतली बरीच मुलं नीरा डाव्या कॅनलमध्ये किंवा विहिरीत तरी शिकली आहेत. आपल्याकडे कॅनॉलचा ३३ फाटा आहे. त्या फाट्यात आम्ही पोहायचो. उन तापायला लागलं की पुन्हा बाहेर यायचो आणि मातीत झोपायचो. राजूदादा तीच आठवण काढत होता की ‘कशी रे अजित तेव्हा मजा यायची’. आता काय मजा येते ते बघू”, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी यावेळी केली.

Video: “ही मंत्र्यांची भाषा आहे का? मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही का?” अजित पवारांचा परखड सवाल!

“माझं तर सांगूच नका. मी तर पाण्याला एवढा घाबरायचो आणि लांबनंच सगळ्यांची मजा बघत बसायचो. माझ्या मागे डबा बांधून ते वरनंच द्यायचे फेकून. त्या डब्याचा दोर तुटला वगैरे तर जाग्यावरच खाली. पण काही आमच्या वरिष्ठांना वाटायचं नाही. तेव्हापासून आमचे वरीष्ठ आमच्याशी असे वागायचे.. तुम्हीच बघा आता काय ते! तरी आम्ही इथपर्यंत पोहोचलोय यासाठी तुम्ही आमचं कौतुक केलं पाहिजे बाबांनो. काय सांगायचं आता तुम्हाला”, असं अजित पवार यांनी म्हणताच सभागृहात पुन्हा हशा पिकला!

“त्या दिवशी मला रात्रभर झोप लागली नाही”

“श्रीनिवास त्या दिवशी पोहायला शिकला आणि मला संध्याकाळी म्हटला दादा मी पोहायला शिकलो. रात्रभर मला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी गेलो आणि पोहायलाच शिकलो. म्हटलं धाकटा भाऊ पोहायला शिकला आणि आपण न शिकता कसं चालेल. ते फार वेगळे दिवस होते”, असं अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar speaks on his swimming skills in baramati supriya sule pmw