पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महिन्यांपूर्वी भोपाळ येथे भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले होते, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. असं एकही क्षेत्र नाही जिथे काँग्रेसने घोटाळा केला नसेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही घोटाळ्यांचे अनेक आरोप आहेत. या आरोपांनंतर महिन्याभराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते शरद पवार यांनी बंडखोरी करून महायुतीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट बरोबर घेत अजित पवार यांनी भाजपा-शिवसेनेशी (शिंदे गट) हातमिळवणी केली आणि ते सत्तेत सहभागी झाले.
नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी आतापर्यंत भाष्य केलं होतं. परंतु, अजित पवार यावर कधीच बोलले नव्हते. काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना अजित पवार यांनी या आरोपांवर भाष्य केलं. अजित पवार, शरद पवार आणि नरेंद्र मोदी आज (१ ऑगस्ट) दुपारी एकाच व्यासपीठावर एकत्र जमले होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि अजित पवार या दोघांशीही बातचित केली.
दरम्यान, नरेंद्र मोदींनी केलेल्या ७०,००० कोटी रुपयांच्या आरोपांवर अजित पवार म्हणाले, नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय आरोप होतात. एमएससी बँक (महाराष्ट्र राज्य सहकार बँक) घोटाळ्याच्या वेळी २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप झाला होता. त्यानंतर १० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप झाला. त्यानंतर याप्रकरणी सीआयडीने चौकशी केली, डीओडब्ल्यू विभागाने चौकशी केली, एसीबीने चौकशी केली, सहकार विभागाने चौकशी केली. आज ती एमएससी बँक गेल्या दोन-तीन वर्षात लागोपाठ ६०० ते ६५० कोटी रुपयांच्या नफ्यात आहे.
हे ही वाचा >> पंतप्रधानांच्या कार्यक्रमातील शरद पवारांच्या उपस्थितीमुळे जनतेत संभ्रम? अजित पवार म्हणाले…
अजित पवार म्हणाले, “मला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक असे प्रयत्न झाले. तरी त्याच्या चौकशीतून काय निष्पन्न होणार आहे हे मला माहिती नसेल तर मी थांबणं गरजेचं आहे. म्हणून मी इतके दिवस थांबलो होतो.” यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांना विचारलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप खोटा आहे का? त्यावर अजित पवार म्हणाले, पंतप्रधान किंवा वेगवगळ्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, आपण त्यांचा आदर राखला पाहिजे. त्यांना जी भूमिका योग्य वाटली ती त्यांनी मांडली. आज त्यांच्या हातात संपूर्ण देश आहे. आरोपांबद्दल चौकशा सुरू आहेत. चौकशीत सत्य बाहेर येईल. दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.