अजित पवारांनी शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय का घेतला यामागील कारण सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (२६ ऑक्टोबर) महाराष्ट्र दौऱ्यावर आले. या दौऱ्यात मोदींनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. तसेच निळवंडे धरणाच्या कालव्यांचं लोकार्पण केलं. यानंतर शिर्डीतील काकडी येथे आयोजित केलेल्या नमो शेतकरी महासन्मान मेळाव्यात अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “गेल्या साडेनऊ ते दहा वर्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द बघितली तर ते साईबाबांच्या सबका मालिक एक या मंत्राप्रमाणेच सबका साथ, सबका विकास या घोषणेनुसार देशाला पुढे नेत आहेत. ते सर्वांना पावलोपावली जाणवत आहे. महाराष्ट्राने कायमच राष्ट्राचा विचार केला आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकटं आली, तेव्हा तेव्हा महाराष्ट्र छातीचा कोट करून राष्ट्राबरोबर उभा राहिला. हा इतिहास आहे. यशवंतराव चव्हाण यांनी हीच भूमिका वारंवार मांडली होती. त्याच भूमिकेतून आज मोदी राष्ट्र बळकट करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.”
“५३ वर्षे कितीतरी वेळा निळवंडे धरणाचा नारळ फोडण्याचं काम”
“माझं आजोळ नगर जिल्हा आहे. मला आठवतंय, ५३ वर्षे कितीतरी वेळा निळवंडे धरणाचा नारळ फोडण्याचं काम अनेक राज्यकर्त्यांनी केलं. निवडणुका आल्या की, नारळ फोडायचा आणि आम्ही आता निळवंडे करणार असं सांगितलं गेलं. बघता बघता तीन पिढ्या यात गेल्या. हे साडेआठ टीएमसीचं धरण आहे. पावणेदोन लाख एकर क्षेत्र यामुळे ओलिताखाली येईल,” असं अजित पवारांनी सांगितलं.
हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राधाकृष्ण विखेंकडून महाराष्ट्रातील दुष्काळावर भाष्य, म्हणाले…
“मोदी निळवंडे धरणाचं जलपुजन करत असताना आम्हाला सांगत होते की, बाबांनो…”
“मोदी निळवंडे धरणाचं जलपुजन करत असताना आम्हाला सांगत होते की, बाबांनो पाणी महत्त्वाचं आहे. ठिबकचा वापर करा. पाण्याची जितकी बचत करता येईल तितकी बचत करा. तरच आपल्या सर्व शेतकऱ्यांना ते पाणी मिळेल. खूप लोकांची जमीन जुमला, घरं दारं त्या निळवंडे धरणात गेली आहेत. त्यानंतर ते पाणी इतरांना मिळणार आहे. जवळपास १८२ गावांना हे पाणी देण्याचं काम होत आहे,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.