उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज (सोमवार, २३ ऑक्टोबर) सोलापूर जिल्ह्यातील विविध विकास कामं आणि लोकांच्या प्रश्नांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देण्यामागचं कारणही सांगितलं. शिवाय आगामी निवडणुकीत जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला पुरेशा जागा मिळतील, असा विश्वासही व्यक्त केला.
उपस्थित लोकांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले, “राज्यातील वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी, आपली कामं होण्यासाठी, बहुजन समाज, वंचित, गरीब, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक वर्गाचं भलं होण्यासाठी आपण ही भूमिका घेतली आहे. आज ४५-५० आमदार अशी भूमिका घेतात, हे साधी गोष्ट नाही. आम्हीही ३०-३५ वर्षे समाजकार्य-राजकारण केलं आहे. आम्हीही वरिष्ठांचा मान राखला आहे. वरिष्ठांचा आदर केला आहे. वरिष्ठांनी जे सांगितलं त्याची अंमलबजावणी केली आहे, हे सगळ्यांना माहीत आहे.”
हेही वाचा- “देवेंद्र फडणवीस खोटं बोलतायत”; रोहित पवारांचं स्पष्ट विधान, म्हणाले, “त्यांनी माफी…”
अजित पवार पुढे म्हणाले, “२०१४ साली आमच्या वरिष्ठांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला. तेव्हा आम्ही गप्प बसलो. त्यांनी घेतलेला निर्णय आम्ही मान्य केला. अशा अनेकदा घटना घडल्या आहेत. त्याचा मी स्वत: साक्षीदार आहे. त्यातूनच आम्ही ही भूमिका स्वीकारली. आम्ही त्यांना (एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस) सांगितलं होतं की, साधारण शिंदे गटाचे जेवढी मंत्रिपदं असतील, तेवढी मंत्रिपदं आम्हालाही मिळावीत. कारण त्यांचेही ५० आमदार आहेत आणि आमचेही तेवढेच आमदार आहेत.”
हेही वाचा- “माझे काका मला चांगल्याप्रकारे ओळखत असावेत, म्हणून…”, अजित पवारांबद्दल रोहित पवारांचं सूचक विधान
“सगळ्यात जास्त आमदार भाजपाचे आहेत. भाजपाचे १०६ आणि बाहेरून पाठिंबा देणारे ९ असे एकूण ११५ आमदार त्यांच्या विचाराचे आहेत. पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रवादीचे ९ सहकारी मंत्रिमंडळात घेतले. मात्र भाजपाची संख्या अधिक असल्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार हे त्रिवार सत्य आहे. राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. त्यांचेही वरिष्ठ पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय होत असतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या काही जागा मिळतील, त्यातून तुम्हाला नाराज करणार नाही, एवढाच शब्द मी तुम्हाला देतो. कारण सहा-सहा वेळा निवडून येणं, ही साधी सोपी गोष्ट नाही. एकदा निवडून आल्यानंतर दुसऱ्यांदा निवडून येताना मी-मी म्हणणाऱ्यांची फाटते. पण आम्हाला माहीत आहे, माणसं कशी सांभाळावी लागतात,” असंही अजित पवार यावेळी म्हणाले.