पुण्यात झालेल्या महायुतीच्या सभेमध्ये आज देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रामदास आठवले, एकनाथ शिंदे अशा अनेक स्टार प्रचारकांनी जोरदार भाषणं केली. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत एकीकडे रामदास आठवलेंनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत केलेल्या कवितांमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला, तर दुसरीकडे अजित पवारांनी भाषणादरम्यान जयंत पाटलांचा जलसंपदामंत्री म्हणून उल्लेख केला आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या!
“बारामतीची निवडणूक भावकीची नाही”
बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा थेट सामना होत असताना अजित पवारांनी मात्र ही भावकीची निवडणूक नसल्याचं म्हटलं आहे. “ही निवडणूक देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं तसं नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. विनाकारण त्यात भावकी आणण्याचा प्रयत्न केला जातो. मतदारांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला जातो. काही लोकांच्या घरी जाऊन त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला जातो”, असं अजित पवार म्हणाले.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील?
दरम्यान, यावेळी अजित पवारांनी भाषण करताना जयंत पाटील यांचा जलसंपदा मंत्री म्हणून उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांसह ४० आमदार गेले. मात्र, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मात्र शरद पवारांसोबतच राहिले. मात्र, त्यांच्या अजित पवारांसोबत येण्याच्या चर्चा मात्र वारंवार होताना दिसतात. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी ‘चुकून’ केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
अजित पवार आपल्या भाषणात बारामती, इंदापूर, दौंडच्या पाण्याचा मुद्दा मांडत होते. त्यावेळी “आम्ही सांगितलं की आम्ही गुंजवणीचं पाणी आणणार. कर्नाटकाला वाया जाणारं पाणी दुष्काळी भागात पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंडमध्ये आणणार”, असं अजित पवार म्हणाले. तेव्हा झालेल्या बैठकीचा संदर्भ देताना जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी चुकून जयंत पाटील यांचंच नाव घेतलं. आधीच्या सरकारमध्ये जयंत पाटील हेच जलसंपदा मंत्री होते!
“जलसंपदा मंत्री या नात्याने जयंत पाटील…”, असं अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. व्यासपीठावरही हास्याची लकेर उमटली. स्वत: अजित पवारही भाषण थांबवून हसू लागले. नंतर त्यांनी चूक सुधारत देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं. “देवेंद्र फडणवीस यांनीही त्याला होकार दिला आहे. ही बैठक एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर विजय शिवतारे, मी, देवेंद्र फडणवीस अशी झाली. आता भोर-वेल्ह्याला विरोधक सांगतायत बघा तुमचं पाणी चाललंय”, असं अजित पवार म्हणाले.
“विरोधक असावा तर विजय शिवतारेंसारखा”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बारामतीमधून थेट अजित पवार व सुनेत्रा पवारांना आव्हान देणारे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचाही अजित पवारांनी भाषणात उल्लेख केला. विजय शिवतारेंनी आधी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, नंतर एकनाथ शिंदेंशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवण्याचा विचार सोडला. त्यामुळे आज अजित पवारांनी त्यांचा उल्लेख करताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. “विरोधक कसा असावा लागतो हे यांच्याकडे बघून आपण शिकायला हवं. मित्रही कसा असावा हेही विजय शिवतारेंकडे बघून शिकायला हवं. एकदा मैत्री केली की पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल. पण मैत्रीला अंतर पडू देत नाहीत असं काम विजय शिवतारेंचं आहे”, असं ते म्हणाले.