Ajit Pawar : सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या रात्री हल्ला झाला. त्यानंतर त्याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला आज पोलिसांनी अटक केली. दरम्यान विरोधकांनी या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांवर टीका केली. मुंबईतली कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे असं विरोधकांनी म्हटलं आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्या विरोधकांचा समाचार घेतला.
काय म्हणाले अजित पवार?
“एखादी बातमी आली की काहीही शहानिशा न करता विरोधक त्यावर काहीही बोलण्यास सुरुवात करतात. सिनेस्टार सैफ अली खानच्या घरात एक चोरटा शिरला. त्याच्यावर हल्ला झाला. या घटनेनंतर काहींनी थेट मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळली अशी वक्तव्यं केली. एक चोरटा शिरल्याने लगेच कायदा सुव्यवस्था ढासळली का?” असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. “जे घडलं ते होताच कामा नये मी काही त्या चोराचं समर्थन करत नाही. मात्र एखादा नवा मुद्दा मिळाला की लगेच फेक नरेटिव्ह पसरवण्यास विरोधक सुरुवात करतात.” असंही अजित पवार पुढे म्हणाले.
आणखी काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार पुढे म्हणाले, “या घटनेनंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली. तो ठाण्यात सापडला. त्याने सगळं कबूल केलं. आठ महिन्यांपूर्वी तो बांगलादेश सोडून कोलकाता या ठिकाणी आला. मुंबईबद्दल त्याने बरंच ऐकलं होतं त्यामुळे जिवाची मुंबई करायला तो इकडं आला. इथं राहून हाऊसकिपिंगचं काम केलं. ज्या एजन्सीकडे काम करत होता त्यांनी आधार कार्ड किंवा महत्त्वाची कागदपत्रं, ओळखपत्रं यांची शहानिशा न करता त्याला काम दिलं. या प्रकरणात त्या एजन्सीवरही कारवाई करण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणातले सगळे धागेदोरे शोधून काढले आहेत. जो चोरटा सैफ अली खान यांच्या घरात शिरला होता त्याला माहीतही नव्हतं की घर नटाचं आहे की नटीचं. कुणीतरी सांगितलं होतं की इथे श्रीमंत लोक राहतात. त्यामुळे सैफ अली खानच्या घरी तो चोरटा गेला होता.” असं म्हणत अजित पवारांनी घटनाक्रम सांगितला.
आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी
सैफ अली खानवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर आज आरोपी मोहम्मद शेहजादला मुंबईतील वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने आरोपी मोहम्मद शेहजाद याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल न्यायालयाने सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात वेगवेगळा संशय व्यक्त केला. आरोपीकडे भारतातील कोणतेही कायदेशीर भारतीय कागदपत्रं नसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच तो बांगालादेशमधून बेकायदेशीरपणे भारतात आल्याचा संशय आहे. याबाबत आता पोलिसांच्या तपासानंतर अधिक माहिती समोर येणार आहे.