Ajit Pawar : महाराष्ट्रातल्या राजकारणात जी महत्त्वाची राजकीय घराणी आहेत त्यातलं एक महत्त्वाचं घराणं म्हणजे पवार घराणं. शरद पवार यांनी एक कुशल राजकारणी आणि बेरजेचं राजकारण करणारा नेता म्हणून त्यांची वाटचाल मागची पाच दशकं सुरु ठेवली आहे. १९९९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षही स्थापन केला. मात्र २०२३ मध्ये अजित पवार पक्षातले ४२ आमदार घेऊन बाहेर पडले. असं सगळं असलं तरीही शरद पवारांना दैवत मानतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट
२०२२ मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली आणि एकनाथ शिंदे हे भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वर्षभराने म्हणजेच २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटला. अजित पवार हे पक्षातले ४२ आमदार घेऊन बाहेर पडले, सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह हे दोन्हीही अजित पवारांना देण्यात आलं.
५ जुलै २०२३ च्या भाषणात अजित पवारांची शरद पवारांवर टीका
५ जुलै २०२३ च्या भाषणात अजित पवार यांनी शरद पवारांनी आता आराम केला पाहिजे त्यांचं वय झालं आहे, मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिलं पाहिजे असं म्हणत खदखद व्यक्त केली होती. दरम्यान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले. तसंच बारामतीची लोकसभेची लढाईही सुनेत्रा पवारांच्या विरोधात सुप्रिया सुळे जिंकल्या. त्यानंतर शरद पवार यांच्याबाबत बोचरी टीका, वयावरुन टीका करणं अजित पवारांनी टाळल्याचं दिसून आलं. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३७ जागा मिळाल्या. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील अशाही चर्चा झाल्या. तसं अजून तरी काही घडलेलं नाही. मात्र शरद पवार कालही दैवत होते आणि आजही आहेत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार पवारांना दैवत मानत होतो, आजही मानतो-अजित पवार
आम्ही घेतलाच ना निर्णय? घरात आम्हीही शरद पवारांना दैवत मानत होतो, आजही मानतो. पण आज देशाला मोदींसारखा मजबूत नेता मिळाला आहे. त्यांच्या पाठिशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करणं महत्त्वाचं आहे. जगात आपल्या देशाचा मानसन्मान वाढवण्यासाठी त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं. आम्ही स्वार्थ पाहणारी माणसं नाही. आज २५ ते ३० वर्षे मी काम करतो आहे. मला कुणीही सांगावं की अजित पवारांनी स्वार्थासाठी काही केलं. आम्ही कायम जनहिताची कामं केली आहेत. लोकांसाठी कामं केली आहेत. पिंपरीत आपल्याकडे आधी एक मतदारसंघ होता. आता तीन झाले आहेत. २०२९ ला पाच मतदारसंघ झाले तर आश्चर्य वाटून देऊ नका असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.