महाराष्ट्रात नुकतंच बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. यातील १४७ बाजार समितींच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने ८०, भाजपा-शिंदे गटाने २९ आणि अपक्ष किंवा सर्वपक्षीय आघाडीने ३८ जागांवर विजय संपादन केला आहे. पण या निवडणुकीत कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याचं विधान अजित पवारांनी केलं आहे.
एका बाजार समितीच्या निवडणुकीत दोन पॅनेल्सने मिळून ५० कोटी रुपये खर्च केल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. तसेच आपण कुणाचंही नाव घेणार नाही, अन्यथा मला त्रास होईल, पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, एवढा खर्च केला आहे, असंही अजित पवार म्हणाले. ते सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, “मित्रांनो, मी नावं घेणार नाही. अन्यथा मला त्रास होईल, पण तुम्हाला विश्वास बसणार नाही. महाराष्ट्रात एका बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ५० कोटी खर्च केला आहे. महाराष्ट्रात १४७ ठिकाणी बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. यातील ८० जागांवर महाविकास आघाडी निवडून आली, तर भाजपा आणि शिंदे गटाने २९ ठिकाणी निवडणूक जिंकली आणि ३८ ठिकाणी अपक्ष किंवा सर्वपक्षीय आघाडी निवडून आल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळालं.”
“आताच्या राज्यकर्त्यांना जनतेनं पूर्णपणे नाकारलं आहे. एका बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही पॅनेल्सचा मिळून एकत्रित खर्च ५० कोटी रुपये इतका आहे. एवढा खर्च करायला बाजार समितीत एवढं काय आहे? हेच मला समजलं नाही. येथे लोकांची कामं करावी लागतात. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे लागतात. शेतकऱ्यांच्या मालाला दर्जेदार भाव मिळावा, यासाठी काम करावं लागतं. पण या निवडणुकीत अक्षरश: पैशांचा धुमाकूळ झाला आहे. हे सरकार आल्यापासून राज्याचा कारभार कसा चालला आहे? हे एक महाराष्ट्राचा माणूस म्हणून तुम्ही आत्मचिंतन करायला हवं,” असंही अजित पवार यावेळी म्हणाले.