राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून लढा देत आहेत. आधी उपोषण आणि आता साखळी आंदोलनाद्वारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. आरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी जरांगे पाटील राज्यभर दौरे करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्यासह राज्यातल्या मराठा समाजाला २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे. तर दुसऱ्या बाजूला, मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश केला जाणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. त्यास राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे.तसेच ते सातत्याने मनोज जरांगे पाटलांवर टीका करत आहेत. त्यामुळे मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा संघर्ष सुरू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेगवेगळ्या पक्षांमधील नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे राज्यात जातीय तेढ निर्माण होत आहे. यावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार यांनी कराड येथे चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले, अलिकडच्या काळात वाचाळवीरांची संख्या वाढलेली दिसतेय.

अजित पवार म्हणाले, सगळ्याच पक्षांमध्ये वाचाळवीर वाढले आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्या अधिकाराचा वापर आपण कशा प्रकारे करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु, रोज आपण बघतो कोणीतरी काहीतरी वक्तव्य करतो. कोणी अरे म्हटलं की, का रे म्हणायचं असं सगळं चालू आहे. ही यशवंतराव चव्हाणांची शिकवण नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. मी सगळ्याच पक्षांबद्दल बोलतोय. यामध्ये आम्ही (राष्ट्रवादी काँग्रेस) आलो, सगळेच आले. मी ठराविक कोणाबद्दल बोलत नाही. एका व्यक्तीला बोलत नाही. माझ्यासह सर्वांनीच आत्मपरिक्षण करायला हवं.

हे ही वाचा >> मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारकडून ‘बिहार पॅटर्न’चा विचार? अजित पवार म्हणाले, “आगामी अधिवेशनात…”

दरम्यान, यावेळी अजित पवार यांना छगन भुजबळांच्या वक्तव्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, मी कोणाचं नाव घेऊन बोलत नाही. मी तुम्हा पत्रकारांचा मान ठेवला, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. मी कोणालाही डोळ्यासोर ठेवून बोलत नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील सगळ्यांसाठीच बोललो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar statement on maratha reservation chhagan bhujbal manoj jarange patil asc