मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आजित पवार हे भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकूण ४० आमदार नाराज असून त्यांचा अजित पवारांना पाठिंबा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर आता स्वत: अजित पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
“कारण नसताना माझ्याबद्दल आणि माझ्या काही सहकार्यांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम जाणीपूर्वक केलं जात आहे. वास्तविक ज्या बातम्या दाखवल्या जात आहेत, यामध्ये काहीही तथ्य नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे, अलीकडेच नागपूरला महाविकास आघाडीची सभा होती, तिकडे आम्ही सगळे नेते गेलो होतो,” अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, “आपण सातत्याने माझ्याबद्दल ज्या काही बातम्या पसरवत आहात किंवा दाखवत आहात, त्यामध्ये काहीही तथ्य नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांच्या सह्या घेण्याचं काहीही कारण नाही. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहोत. त्यामुळे संबंधित बातम्यांना कसलाही आधार नाही. काही प्रसारमाध्यमांवर वेगवेगळ्या पक्षाचे लोकदेखील त्यांचं मत व्यक्त करत आहेत. त्यांनी काय मत व्यक्त करावं, हा त्यांचा अधिकार आहे.”
“साधारण मंगळवारी किंवा बुधवारी आमदारांच्या कमिटीच्या बैठका असतात. अनेक आमदार मंत्र्यांकडे किंवा मंत्रालयात कामाच्या निमित्ताने येत असतात. त्यामुळे आजही जे आमदार येथे आले होते, ते मला भेटायला आले होते. ही नेहमीची पद्धत आहे. याचा वेगळा अर्थ काढू नका. संबंधित आमदारांची वेगवेगळी कामं होती. ते आमदार त्यांची विविध कामं घेऊन मला भेटायला आले होते,” असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं आहे.