उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थ खात्याचा कारभार सांभाळताना आकडेमोडीत तसे माहीर समजले जातात. त्यामुळे गणित त्यांच्या आवडीचा विषय असावा. त्याचे प्रत्यंतर सोलापूर जिल्ह्यातील एका शाळा भेटीतही आले. शनिवारी (३० एप्रिल) उपमुख्यमंत्री पवार मोहोळ तालुक्यात आले. यावेळी त्यांनी पापरी गावच्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी अजित पवारांनी केवळ शाळेची पाहणी करून विद्यार्थ्यांशी नुसता संवादच साधला नाही, तर चक्क गणिताचा वर्गही घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यार्थी, शिक्षकांसह लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर अजित पवार शिक्षकाच्या भूमिकेत गेले. त्यांनी विद्यार्थ्यांचा चक्क गणिताचा वर्ग घेतला. अजित पवार यांनी विद्यार्थ्यांकडून गणित विषयासह नऊ आणि बाराचा पाढा म्हणवून घेतला. मुलेही गणितात कच्ची नव्हती.

शालेय गणवेशावरून विद्यार्थीनीचं उत्तर ऐकून अजित पवारांनी लावला डोक्याला हात

यावेळी अजित पवार यांचं लक्ष एका विद्यार्थीनीकडे गेले. तिने शाळेचा गणवेश घातला नव्हता. त्याबद्दल त्यांनी विचारले असता त्या विद्यार्थीनीने शाळेत येताना गणवेश घालायला विसरले असे उत्तर दिले. हे उत्तर ऐकून अजित पवारांनी डोक्यावर हात लावला. “गणवेश घालायला विसरलीस, बरे झाले शाळेला यायला विसरली नाहीस,” असा शेरा अजित पवार यांनी मारताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

“सोलापूर जिल्ह्यातील अडीच हजार शाळांचे रूप पालटले”

अजित पवार म्हणाले, “लोकसहभागातून आठ कोटी रूपये खर्च करून सोलापुरात जिल्हा परिषदेच्या स्वच्छ शाळा-सुंदर शाळा अभियान राबवण्यात आलं. यापूर्वी आपण केवळ या अभियानाची माहिती घेतली होती. आज शाळा भेटीत हे अभियान प्रत्यक्ष पाहता आले. या अभियानामुळे सोलापूर जिल्ह्यातील अडीच हजार शाळांचे रूप पालटले आहे.”

“स्वच्छ शाळा-सुंदर शाळा अभियान राज्यातील सर्व शाळांमध्ये राबवावं”

“आता या सर्व शाळा गुणवत्तापूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. हे अभियान राज्यातील सर्व शाळांमध्येही राबविण्यात यावे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीसह लोकप्रतिनिधींचा विकास निधी, खासगी कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी या माध्यमातून हे अभियान राबविणे शक्य आहे,” असेही अजित पवार यांनी नमूद केलं.

या भेटीत पापरी शाळेची गुणवत्ता आणि पहिली ते आठवीपर्यंत ६६२ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती देण्यात आली. मात्र मुलांसाठी खेळायला मैदान नसल्याची अडचण पुढे करून त्यासाठी अडीच एकर गायरानाची जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर अजित पवार यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांना तशा सूचना दिल्या.

हेही वाचा : “जातीयतेढ निर्माण करणाऱ्यांच्या पाठीशी एकेकाळी १४ आमदार होते, परंतु…”; अजित पवारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

शनिवारी उपमुख्यमंत्री पवार मोहोळ तालुक्यात आले होते. त्याचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या स्वच्छ आणि सुंदर शाळा अभियानाची पाहणी पवार यांनी केली. त्यांच्या समवेत सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, मोहोळचे आमदार यशवंत माने, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदींचा लवाजमा होता.