राज्य विधिमंडळातं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या चालू असून आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आर्थिक मदतीचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी होण्याची शक्यता आहे. याच आठवड्यात अर्थसंकल्पदेखील सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना एक खंत बोलून दाखवली आहे.
“महाराष्ट्र सरकारला हे शोभत नाही”
आज देशासह जगभरात महिला दिन साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका करताना महिला मंत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. “एका गोष्टीची खंत वाटते की एवढा मोठा आपला महाराष्ट्र आहे. पण तिथे जागतिक महिला दिनाच्या दिवशी मंत्रीमंडळात एकही महिला नसणं हे कमीपणाचं वाटतं. महाराष्ट्र सरकारला ते शोभत नाही”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
“काय अडचण आहे कळायला मार्ग नाही”
दरम्यान मंत्रीमंडळ विस्ताराचा मुद्दा गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा चर्चेत आला आहे. तसेच, यामध्ये महिला मंत्र्यांना स्थान मिळावं, अशी मागणीही विरोधकांकडून करण्यात आली आहे. यावरही अजित पवारांनी भूमिका मांडली. “मी तर अनेकदा जाहीर सभांमधून आणि माध्यमांतही या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सभागृहातही बोललो आहे. पण काय अडचण आहे हे कळायला मार्ग नाही. ही गोष्ट आम्हालाही आणि महिला वर्गालाही योग्य वाटत नाही”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र भाजपामध्ये मोठे फेरबदल होणार, बावनकुळे म्हणतात, “मी प्रदेशाध्यक्ष झालो तेव्हाच…”!
अवकाळी पावसाचा मुद्दा अधिवेशनात मांडणार
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी अवकाळी पावसाचा मुद्दा अधिवेशनात मांडणार असल्याचं सांगितलं. “शेतकऱ्यांचं मोठं नुकसान अवकाळी पावसामुळे झालं आहे. हवामान खात्याने ६ ते ९ मार्च असा हवामान बदलाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे अजूनही दोन दिवस नुकसान होऊ शकतं. त्यामुळे अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई दिली जावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत”, अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.