शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्र्यातील घरावर आणि मुंबई-पुणे-रत्नागिरीतील इतर ठिकाणांवर आज ईडीनं धाड टाकली. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल परब यांची चौकशी सुरू असून त्यासंदर्भातच या धाडी टाकल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये किरीट सोमय्यांनी आरोप केलेल्या दापोलीतील रिसॉर्टवर देखील धाडी टाकण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावरून आता राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून त्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तपास यंत्रणांचा तो अधिकार असल्याचं नमूद करतानाच अजिच पवारांनी सूचक शब्दांत टोला देखील लगावला आहे.

आज सकाळीच अनिल परब यांच्या मरीन ड्राईव्ह येथील सरकारी निवासस्थान आणि वांद्र्यातील घरी ईडीचे अधिकारी दाखल झाले. अनिल परब यांच्याशी संबंधित ७ विविध ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या आहेत. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यापाठोपाठ अनिल परब यांना देखील तुरुंगात जावं लागणार असल्याचा इशारा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

“माझ्याही नातेवाईकांच्या बाबतीत…”

दरम्यान, यासंदर्भात बोलताना अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांवर प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडींचा संदर्भ दिला. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “केंद्रीय यंत्रणा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना दिलेल्या अधिकारांचा वापर करतात. मागेही अनेकांच्या बाबतीत इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीनं कारवाया केल्या. माझ्याही नातेवाईकांच्या बाबतीत इन्कम टॅक्सनं धाडी टाकल्या. त्यांना तपास करण्याचा अधिकार आहे. आत्ताही कारवाई चालू आहे असं मला समजलं. पण कोणत्या आधारावर कारवाई सुरू आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Anil Parab ED Raid: शिवसेना नेते अनिल परब यांच्या घरावर ED ची धाड; मुंबई, पुणे आणि रत्नागिरीत कारवाई सुरु

“काही जण बोलतात आणि नंतर तशा पद्धतीने घडतं”

“मागेही काहींनी सूतोवाच केले होते की आता अमक्याचा नंबर, तमक्याचा नंबर. काही जण बोलतात आणि नंतर तशा पद्धतीने घडतं. यात असा यंत्रणांकडून कुणाचाही हस्तक्षेप न होता पारदर्शकपणे तपास करण्यासाठी कुणाची ना नाही. तपासाचा अधिकार नियमाने त्यांना दिला आहे. पण त्याचा गैरवापर होऊ नये एवढी माफक अपेक्षा सगळ्यांची असते”, असं ते यावेळी म्हणाले.

Story img Loader