कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या शिबिरातून अनेक नेतेमंडळींनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे मांडले. यावेळी एकीकडे छगन भुजबळांनी मराठा आरक्षण व शरद पवार गटाकडून केली जाणारी टीका यावर सविस्तर भूमिका मांडली असताना दुसरीकडे गटाचे प्रमुख अजित पवार यांनी पक्षातील व्यवस्थेवर भाष्य केलं. मात्र, यावेळी बोलताना त्यांनी सिंचन घोटाळ्यात त्यांच्यावर झालेल्या आरोपांवरही भाष्य केलं.
ठाकरे गटाकडील जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार!
अजित पवारांनी आपल्या भाषणात लोकसभा निवडणुकांसाठी गटाचं नेमकं काय धोरण असेल, याबाबत भाष्य केलं. “लोकसभा निवडणुकीत बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या आपल्याकडे असलेल्या जागा आपण लढवणारच आहोत. पण त्याबरोबर ठाकरे गटाकडे ज्या जागा आहेत, त्यातल्याही काही जागा आपण लढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जागावाटपावर प्राथमिक चर्चा झाली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर यावर सविस्तर चर्चा करण्याचं आपलं ठरलं आहे”, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
छगन भुजबळांचं शरद पवारांवर शरसंधान; म्हणाले, “एवढी चिडचिड…!”
“आरोप सिद्धही व्हावे लागतात”
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी त्यांच्यावरील आरोपांवर भाष्य केलं. “काही आमच्यावर आरोप करतात की यांच्यावर केसेस होत्या त्या थांबाव्यात म्हणून हे गेले. आमच्यापैकी काहींनी १९९९ पासून बहुतेक मंत्रीमंडळांत काम केलं आहे. त्यामुळे आमच्यावर आरोप झाले. पण आरोप झाले म्हणजे ते सिद्धही व्हायला पाहिजे असतात. माझ्यावर झालेल्या आरोपांमुळे जलसंपदा विकासकामांची गती रेंगाळली. तेव्हा मी निधीला मान्यता द्यायचो म्हणून मला टार्गेट करण्यात आलं. माधवराव चितळेंच्या अध्यक्षतेखाली ५ तज्ज्ञांची समिती होती. तेव्हाचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनीच नावं दिली होती. चितळेंचा अहवाल आला. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी त्या अहवालाला मंत्रीमंडळातमान्यता दिली नाही”, असं अजित पवार म्हणाले.
“आम्ही बोलतो तसं वागतो”
“मी आज ३२ वर्षं काही अपवाद वगळता मंत्रीमंडळात काम करतोय. मी १२-१२-२०१२ ला राज्यात सातत्याने भारनियमन होतं त्यातून मुक्त करणार असं सांगितलं होतं. त्यानुसार मी मुक्त केलं होतं. आम्ही बोललो तसं वागतो आणि करतो”, अशी भूमिकाही अजित पवारांनी यावेळी मांडली.