गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प अजित पवारांनी विधानसभेत मांडण्यापूर्वीच फुटला होता, असा दावा केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतरही काही नेत्यांनी अजित पवारांना लक्ष्य करताना हा आरोप केला. विधिमंडळ अधिवेशनातही विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनीही अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान अर्थसंकल्प फुटल्याचा उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर आज विधानसभेत केलेल्या भाषणादरम्यान अजित पवारांनी अर्थसंकल्प फुटल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले अजित पवार?

अर्थमंत्री अजित पवार यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच विरोधकांच्या ‘अर्थसंकल्प फुटला’ या आरोपावर उत्तर दिलं. “भाषणाच्या सुरुवातीलाच मी एक गोष्ट स्पष्ट करतो. अर्थसंकल्प फुटल्यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटील यांनी विधान केलं. हे दोन्ही सदस्य अतिशय ज्येष्ठ आहेत. अर्थसंकल्पापूर्वी वर्तमानपत्रात नेहमीच अर्थसंकल्पातील तरतुदी छापून आल्याबाबत त्यांनी आक्षेप घेतला. जयंत पाटील यांनी तर ९ वेळा अर्थमंत्रालयाची जबाबदारी सांभाळली आहे. अर्थसंकल्पाकडून नागरिकांच्या काही अपेक्षा असतात. या अपेक्षांचा कानोसा घेऊन माध्यमांमध्ये त्यावर चर्चा होत असते. त्यासंदर्भातल्या बातम्या छापल्या जात असतात. लोकांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब त्यात दिसत असतं”, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांच्या ‘मी नवखा नाही’ विधानावर शरद पवारांचं खोचक भाष्य; म्हणाले, “खिशात ७० रुपये असताना…”!

“अर्थसंकल्पापूर्वी काही बातम्या वर्तमानपत्रांत, माध्यमांमध्ये आल्या म्हणजे अर्थसंकल्प फुटला असं म्हणता येणार नाही. हे सदस्य तसं म्हणत असतील तर ते माध्यमांवर अन्याय करणारं आहे. मी स्पष्टपणे सांगतो, की अर्थसंकल्प कुठेही फुटलेला नाही. त्याची गोपनीयता पूर्णपणे राखली गेली आहे”, असं अजित पवार म्हणाले.

काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवार यांनी २९ जुलै रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना अर्थसंकल्पावर खोचक टीका केली होती. तसेच, अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच फुटल्याचा आरोप केला होता. “अर्थसंकल्पसंदर्भातली माहिती आधी बाहेर येता कामा नये. कारण त्याला अर्थसंकल्प फुटला असं म्हणतात. काल अर्थसंकल्प मांडण्यात आला. पण त्याच्या आदल्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत अर्थसंकल्पात काय काय येणार आहे, ते छापून आलं होतं”, असं शरद पवार म्हणाले होते.

यावेळी माध्यम प्रतिनिधींनी अजित पवारांच्या ‘मी काही नवखा नाही’ विधानाबाबत विचारणा केली असता शरद पवारांनी त्यावर टोला लगावला. “एखाद्या गोष्टीवर मी १०० रुपये खर्च करणार म्हटलो आणि माझ्या खिशात ७० रुपये आहेत, तर मग मी १०० रुपये खर्च कसे करणार? पहिला प्रश्न हा आहे की तुमच्याकडे महसुली जमा किती आहे? दुसरं महसुली खर्च किती होणार आहे? आणि जमेपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असताना खर्चाचा फरक कसा भरणार? याची तरतूद न करता खर्च करणार म्हटलं आणि विचारपूर्वक केलंय असं म्हटलं तरी त्याला फारसा काही अर्थ राहात नाही”, असा टोलाही शरद पवारांनी लगावला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar targets sharad pawar vijay wadettiwar on budget leak claim in maharashtra assembly session pmw