आठ महिन्यांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन होताच महाविकास आघाडीतील कामांना सरकारने स्थगिती लावली. यावरून विरोधकांनी सातत्याने सरकारवर टीकास्र डागलं आहे. आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही सरकारचा समाचार घेत हा कोणता न्याय आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहमदनगरमधील पाथर्डीत बोलताना अजित पवार म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री झाल्यावर आमदारांचा निधी पहिल्या वर्षी तीन कोटी, दुसऱ्या वर्षी चार कोटी आणि मागील वर्षी पाच कोटी केला. भाजपाच्याही आमदाराला ५ कोटी, कर्जत-जामखेडचा आमदार आणि श्रीगोंद्याच्याही आमदाराला ५ कोटी रुपये मिळाले. जनतेचे प्रश्न सुटण्यासाठी डीपीडीसीचे पैसे कमी न करता जास्तीचा निधी दिला.”

हेही वाचा : “तू आमदार निवडून दिला असता, तर कशाला…”, भर सभेत समोरून आलेल्या प्रश्नावर अजित पवारांची टोलेबाजी!

“जनतेच्या मनात येईल तेव्हा…”

“पण, ह्यांच सरकार आल्यावर आमच्या काळातील कामांना स्थगिती दिली. तिथे माणसं राहत नाहीत का? आमचेही कामं करा, तुम्हीही नवीन कामं करा. जास्तीची कामं झालं म्हणून काय होतं. परंतु, हा कसला रडीचा डाव खेळता. पाच-पाच लाख लोकसंख्येच प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदारांनी कामं तुम्ही थांबवता हा कोणता न्याय आहे. सरकार बदलत असतात. ताम्रपट घेऊन जन्माला कोणी आलं नाही. आताचे बसलेले सुद्धा नाही. जनतेच्या मनात येईल तेव्हा बदल करते,” असा इशारा अजित पवारांनी सरकारला दिला आहे.

हेही वाचा : “कसब्याची निवडणूक तर अशी झोंबलीये…”, अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला; म्हणाले, “ताम्रपट…!”

“प्रत्येक आमदाराला सांगितलं होतं, तुला…”

मंत्रिमंडळ विस्तारावरूनही अजित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “प्रत्येक आमदाराला सांगितलं होतं, तुला मंत्री करतो, तुला करतो. पण, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मंत्रिमंडळ विस्तार केला, तर बाकीची आमदार माघारी जातील आणि सरकार पडेल ही भिती आहे. म्हणून विस्तार केला जात नाही. मात्र, याने महाराष्ट्राचं नुकसान होत आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.