वाई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष आता राज्यातील महायुतीचा एक भाग बनला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ते येण्यामुळे महायुतीतील अगोदरचे भाजप किंवा शिवसेना हे घटक पक्ष नाराज होण्याचे काहीच कारण नाही. उलट त्यांच्यासोबत महायुतीचे विचार आणि धोरण आता वेगाने राबवले जाईल असे मत साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
देसाई म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना अजित पवार यांचे विचार आणि धोरणे ही त्या वेळेच्या तीन पक्षांच्या धोरणानुसार होती. आता ते महायुतीचे भाग बनलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व त्यांनी मान्य केले आहे. यामुळे त्यांचे विचार आणि धोरण हे आता महायुतीला सुसंगत अशीच असणार आहेत. त्यामुळे त्यांच्या येण्यामुळे महायुतीला किंवा युतीतील घटक पक्षांना कुठलाही धोका नाही. तसेच त्यामुळे नाराज होण्याचेही कारण नाही.
शिवसेनेत कसलीही नाराजी नसल्याचे सांगत देसाई म्हणाले, की मंत्रिमंडळ विस्तार आणि खात्यांमधील बदलाचे सर्वाधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. ते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. अजित पवार यांच्या समावेशामुळे महायुती भक्कम झाली आहे. तर महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिली झाली आहे. यापूर्वी मी वेगळ्या पक्षात आणि ते वेगळ्या पक्षात होतो. त्यांची काम करण्याची पद्धती मी जवळून पाहिली आहे. मैत्री जपण्यात ते अव्वल असून, ते चलनी नाणे आहे. आगामी काळात राष्ट्रवादीचे चिन्हदेखील अजित पवार यांना मिळेल, असे मला वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.
देसाई म्हणाले, की आम्ही मोठ्या विश्वासाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. अलीकडेच अजित पवार यांनी आमच्या सरकारबरोबर वाटचाल सुरू केली आहे. ते आल्यामुळे आमच्यात कोणतीही नाराजी नसून, आमच्या गटातील मी नव्हे, तर प्रत्येकजण मंत्री आहे. आमदार भरत गोगावले, आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, देसाई म्हणाले, की अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोठ्या मनाने आम्ही सर्वांनी स्वागत केले आहे. काही गोष्टी बदलतील. जो काही सत्तेचा वाटा मिळणार होता, तो तर आत्ताही मिळणारच आहेत.