राज्यातील महाविकास आघाडी कोसळून एकनाथ शिंदे आणि भाजपाचं सरकार सत्तेत आलं. या डबल इंजिन सरकारला आता अजित पवार गटाचीही साथ मिळाली असून हे सरकार आता ट्रिपल इंजिन सरकार झालं आहे. आगामी निवडणुकांमध्येही हे तिन्ही घटकपक्ष-गट एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. परंतु, हे तिघेही एकत्र येऊन निवडणूक कसे लढवणार? असा प्रश्न राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
“हे तिघे एकत्र कसे लढणार? हा मोठा प्रश्न आहे, असं संभाजीराजे म्हणाले. हे गणित लोकसभेसाठी आहे, असंही ते म्हणाले. “हे नऊ मंत्री आणि एनसीपीवाले परत मोठ्या साहेबांकडे परत जातील”, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.
हेही वाचा >> “हात जोडून कोकणी बांधवांना विनंती आहे की…”; कोकण जागर यात्रेतून राज ठाकरेंनी मांडलं जमिनींचं गणित!
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पद धोक्यात आलं असून ते लवकरच या पदावरून मुक्त होतील, अशी अटकळ बांधली जात आहे. तर, त्याजागी अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. यावरूनही छत्रपती संभाजीराजे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “अनेकजण म्हणतात की अजित दादा मुख्यमंत्री होणार. माझं चॅलेंज आहे की होऊच शकत नाहीत”, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.