‘शरद पवार देशाच्या राजकारणातील सर्वांत जास्त भ्रष्टाचारी आहेत. ते भ्रष्टाचाराचे म्होरके आहेत. राज्यातील भ्रष्टाचाराला पवारांनी संस्थात्मक स्वरूप दिले,’ असा जोरदार हल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पवार यांच्यावर चढवला होता. अमित शाहांनी टीका केल्यानंतर याचे पडसाद राज्याच्या राजकारणावर उमटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अमित शाह आणि भाजपावर टीका केली. एवढंच नव्हे तर अमित शाहांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटातील आमदारांनीही नाराजी व्यक्त केली. परंतु, याबाबत अजित पवारांना विचारलं असता त्यांनी अवघ्या दोन शब्दांत उत्तर दिलं.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अधिवेशनात अमित शहा यांनी पवार, ठाकरे आणि राहुल गांधींचा समाचार घेतला. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत राज्यासाठी केलेल्या कामांची आणि निधीची यादी सादर करताना केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना, ‘शरद पवार यांनी दहा वर्षांत काय केले, याचा हिशोब द्यावा,’ असे आव्हान दिले. अमित शाहांच्या या जहरी टीकेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपावर टीका केली. याबाबत टीव्हीने अजित पवारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता नो कॉमेंट्स या दोन शब्दांत उत्तर दिलं. म्हणजेच, अजित पवारांनी या प्रकरणावर बोलण्यासच नकार दिला आहे.
हेही वाचा >> शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
अजित पवार गटातील आमदार नाराज
अजित पवारांनी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली नसली तरीही अजित पवार गटातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाने केलेली टीका योग्य नसल्याचं मत अजित पवारांचे कट्टर समर्थक विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केल आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. आमदार बनसोडे म्हणाले, शरद पवार हे देशाचे नेते आहेत. ते भाजपानेही कबुल केलेलं आहे. भाजपाने शरद पवारांचा आदरच केला पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शरद पवार हे माझे गुरू आहेत, असं म्हटलं होतं. यावरून भाजपा नेते अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, ते योग्य नाही.”
हेही वाचा >> पिंपरी-चिंचवड: शरद पवारांच्या टीकेवर अजित पवारांच्या आमदारांची नाराजी; अमित शहांनी केली होती जहरी टीका
शरद पवार सरदार तर अजित पवार कोण?
अमित शाहांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर यावर बच्चू कडू यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले शरद पवार जर भ्रष्टाचाराचे सरदार असतील तर मग लोक विचारणार की अजित पवार कोण आहेत? सरदारांचे पुतणे आहेत की कोण आहेत? त्यामुळे शाह विसरभोळे झाले असावेत. अमित शाह असं वादग्रस्त वक्तव्य करतात आणि त्यांच्या अंगलट येतं.”