राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांनी नुकताच राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक घोषणा केल्या असून त्यावरून सध्या विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे. विशेषत: आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच हा अर्थसंकल्प मांडण्यात आल्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी अजित पवारांनी विशेष व्हिडीओ संदेश जारी केला असून त्यातून विरोधकांच्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवारांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर “महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्त्वपूर्ण संदेश”, अशा मथळ्याखाली एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी अर्थसंकल्पातील अनेक तरतुदींचा उल्लेख केला. त्यासंदर्भात विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या टीकेवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“मी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केला आहे. असा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचं भाग्य मला लाभलं याचा मला सार्थ अभिमान आहे. या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली. आजवर आपण पाहात आलोय की प्रत्येक कुटुंबातील आई स्वत:वरील खर्चाची काटकसर करून मुलांना काही कमी पडणार नाही याची काळजी घेत असते. पण आर्थिक अडचणींमुळे कधीकधी घरातल्या मुलींकडे दुर्लक्ष होतं. पण या योजनेमुळे राज्यातील माता-भगिनींची ही विवंचना दूर होईल. त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील”, असं ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राष्ट्रवादी’ला ‘गळती’, अजित पवारांची साथ सोडून आणखी दोन पदाधिकारी शरद पवार गटात

“या लोकांमध्ये आणि माझ्यात हाच फरक आहे की…”

“अनेक नकारात्मक लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहेत. त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जात आहे. काहींकडून तर या अर्थसंकल्पाला लबाडाच्या घरचं अवताण आणि यासारखी बरीच नावं ठेवून हिणवलं जात आहे. मला इतकंच सांगायचंय की या लोकांमध्ये आणि माझ्यामध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणारे आहेत आणि तुमचा दादा काम करणारा आहे”, असं अजित पवार म्हणाले.

“मी गोरगरीब जनतेला तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्याबदल्यात मला शिव्या-शाप मिळतायत. माझा दोष फक्त इतकाच की मी शेतकऱ्यांची दु:ख आणि वेदना समजून घेतल्या. सरकारी योजनेच्या माध्यमातून त्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला”, अशा शब्दांत अजित पवारांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

“विरोधकांनी मला शिव्या द्यायचंच ठरवलंय”

“अर्थसंकल्पात आम्ही ४४ लाख शेतकऱ्यांचं वीजबिल माफ केलं आहे. हे सहन होत नाही म्हणून विरोधकांनी मला शिव्या द्यायचं ठरवलेलं दिसतंय. आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान दिलं याला त्यांचा विरोध का? यावरून कोण शेतकरी विरोधी आहे हे आपल्याला लक्षात आलं असेलच”, असं विधानही त्यांनी या व्हिडीओमध्ये केलं आहे.