राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षातील अंतर्गत वाद, पाडापाडी व जिरवाजिरवीच्या राजकारणावरून कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे. तसेच प्रत्येकाने प्रामाणिकपणे राष्ट्रवादी पक्षाचं काम केलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. ते गुरुवारी (१५ जून)धुळ्यात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, “गेल्या काही वर्षात आपल्यातील वादामुळे, जिरवाजिरवीच्या खेळामुळे धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे यापुढे पाडापाडी आणि जिरवाजिरवी हे राजकारण खपवून घेतलं जाणार नाही. प्रत्येकाने प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलं पाहिजे.”

“पैसा जनतेचा आणि जाहिरातबाजी यांची”

दरम्यान, अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप केला. “पैसा जनतेचा आणि जाहिरातबाजी यांची. कोणाला बघायचे नसेल तरी यांचेच फोटो बघा,” असे टीकास्त्र अजित पवार यांनी येथे नंदूरबारमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे – फडणवीस सरकारवर सोडले.

“जाहिरातबाजीतून जनतेच्या रोजी रोटीचा प्रश्न सुटणार आहे का?”

अजित पवार म्हणाले, “सरकारच्या जाहिरातबाजीतून जनतेच्या रोजी रोटीचा प्रश्न सुटणार आहे का, मग हा करोडो रुपयांचा खर्च कशासाठी? शासन आपल्या दारी मोहिमेत करोडो रुपये खर्च होत आहेत. लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम तुमचेच आहे, त्याच्यासाठी जाहिरातबाजी का?” दीड वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नसल्याबद्दलही अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा : ‘त्या’ जाहिराती कोणी दिल्या? अजित पवार म्हणाले, “अधिकाऱ्यांनी मला सांगितलं…”

“राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या”

“राज्यात अवकाळी आणि वादळाने मोठे नुकसान झाले असतांना शेतकऱ्यांच्या पदरी घोषणांव्यतिरिक्त काहीही पडलेले नाही. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. राजकीय हस्तक्षेप नसल्यास वारकऱ्यांचा पालखी सोहळा शांततेत पार पडतो. जलजीवन योजनेत गावपाड्याचे निरीक्षण न करताच ठेकेदारांच्या सोईसाठी निविदा काढण्याचे काम सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीची कामे, पानंद रस्ते या सर्वाच्या मंजुरीमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे,” असे आरोप अजित पवारांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar warn ncp worker over internal politics in dhule party unit pbs
Show comments