राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा संसर्ग आणि महाराष्ट्रातील वाढते करोना रूग्ण या पार्श्वभूमीवर गंभीर इशारा दिला आहे. राज्याचं अधिवेशन केवळ ५ दिवसांचंच होतं, तरी या पाच दिवसात १० मंत्री आणि २० हून अधिक आमदार करोनाग्रस्त झाले. यावरून जनतेने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या, असा इशारा अजित पवारांनी दिला. तसेच महाराष्ट्राने तिसऱ्या लाटेची तयारी केल्याचंही त्यांनी नमूद केलं.
अजित पवार म्हणाले, “आमचं पाचच दिवसांचं अधिवेशन होतं. या ५ दिवसात १० मंत्री आणि २० हून अधिक आमदार करोनाग्रस्त झालेत. हे अधिवेशन आणखी वाढवलं असतं तर निम्मे मंत्री आणि निम्मे आमदार करोनाग्रस्त झाले असते. यावरून सगळ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या. मी तर सभागृहातील व्यक्ती माझ्या बाजूचा आहे की विरोधी बाजूचा आहे हा भेदभाव केला नाही. सगळ्यांना आवाहन केलं.”
“फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका सगळीकडे २-३ लाख रूग्णांच्या पुढे आकडे”
“हे मोठं संकट जगावर आलं आहे. फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका सगळीकडे २-३ लाख रूग्णांच्या पुढे आकडे गेलेत. काही ठिकाणी बेड शिल्लक नाहीत. आपल्याकडे ज्यांना करोना होतो आहे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागत नाही. घरीच ठेऊन नीट औषधपाणी केलं, आराम केला तर बरे होतात. असं असलं तरी प्रत्येकाने काळजी घेणं सर्वांची जबाबदारी आहे,” असं पवारांनी सांगितलं. तसेच महाराष्ट्राने तिसऱ्या लाटेची तयारी केली असल्याचंही नमूद केलं.
“यापुढे कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही”
अजित पवार म्हणाले, “राज्यात ओमायक्रोन आजाराची संख्या वाढल्याने राज्यात कोणत्याही कार्यक्रमाला गर्दी करू नये. लग्न समारंभ देखील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न करा. अन्यथा, ओमायक्रॉन आजाराचा धोका वाढल्यास राज्यावर लॉकडाऊन करण्याची देखील वेळ येऊ शकते.”
“…म्हणून कार्यक्रमाला १ तास आधीच जातो आणि उद्धाटन करतो”
यावेळी अजित पवारांनी कार्यक्रमाला गर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांना यापुढे कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमात मी उपस्थित राहणार नाही, असा सज्जड इशारा दिला. तसेच मी कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी, गर्दी कमी व्हावी यासाठी १ तास आधीच जातो आणि उद्धाटन करतो, असं नमूद केलं.
हेही वाचा : “काही लोकांकडून जातीयवादाचा प्रयत्न, तर कुणी पाहुणेरावळ्याचा…”, अजित पवारांचा जिल्हा बँक निवडणुकीवर निशाणा
“लोक मास्क कमी लावत आहेत”
“आम्ही सकाळी नायगावला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९१ वी जयंती होती तेथे होतो. आम्ही अभिवादन करण्यासाठी गेलो होतो. तिथंही आम्ही सरपंच, आमदार अशी सर्वांशी बैठक घेतली. तिथं मी काही बाबी कबुल केल्या आहेत आणि मी त्या देणार आहे. मात्र, लोक मास्क कमी लावत आहेत. काहीजण मास्क न लावता तेवढ्यापुरता स्वतःचा रुमाल बांधतात आणि पुढे येतात. म्हणजे मास्क त्यांच्याकडे नाहीच आहे. असं होता कामा नये, सर्वांनी मास्क वापरला पाहिजे,” असं आवाहनही अजित पवार यांनी केलं.