Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar in NCP Phaltan Rally : “तुम्ही दीपक चव्हाण यांच्या (फलटणचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार) प्रचाराला जा, मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता”, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री व आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना दिला आहे. फलटण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) प्रचारसभेत अजित पवार बोलत होते. अजित पवार रामराजे निंबाळकरांना उद्देशून म्हणाले, “तुम्ही बंद दाराआड बैठका घेता, मात्र तुमच्यात धमक असेल तर आमदारकीला लाथ मारा आणि तिकडे (शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात) जा मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) फलटणचे उमेदवारी सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ पक्षाने शनिवारी (९ नोव्हेंबर) रात्री फलटण येथे आयोजित केलेल्या सभेत अजित पवार बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले, “रणजीत सिंह नाईक निंबाळकर मला सांगत होते, श्रीराम सहकारी साखर कारखाना त्यांनी (रामराजे निंबाळकर कुटुंबाने) सुरू केला. या लोकांनी हा कारखाना इतरांना चालवायला दिला आहे. साखर कारखाना काढल्यानंतर सात वर्षात सरकार मदत करून कारखान्याला कर्जमुक्त करतं. तुम्ही २५ ते ३० वर्षे झाली कारखाना चालवत आहात. एक अख्खी पिढी या कारखान्यावर मोठी झाली. मग तुम्ही नेमकं करता काय? तुमच्यात धमक आणि ताकद नाही का? तुम्ही तर श्रीमंत… राजे… आहात. तुम्ही उघड उघड त्या दीपक चव्हाणच्या प्रचाराला जाऊन दाखवा, मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता. तुम्ही आता तिकडे (शरद पवारांच्या राष्ट्रवादी) गेलेले आहात ना मग आमदारकीचा राजीनामा द्या. त्या आमदारकीवर लाथ मारा आणि मग जावा, तुमच्यात खरंच धमक आणि ताकद असेल तर तुम्ही आमदारकीवर लाथ मारून तिकडे जा मला काहीच वाटणार नाही”.

हे ही वाचा >> “शरद पवार राजकारणातून बाजूला झाल्यानंतर हा पठ्ठ्या…”, अजित पवारांचं सूचक वक्तव्य

अजित पवारांची रामराजेंवर टीका

अजित पवार म्हणाले, “आम्ही रामराजे नाईक निंबाळकरांच्या हाती सूत्रे दिली, त्यांचा योग्य मानसन्मान ठेवला. त्यांना सभापती देखील केलं, मंत्रिमंडळात कित्येक महत्त्वाची खाती दिली. मात्र त्यांचं आणि रणजीतसिंह नाईक निंबाळकरांचं काही जमलं नाही. त्या दोघांचा काही बांधाला बांध नाही. तरीदेखील त्यांचं का जमलं नाही ते माहिती नाही. मी सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न केला, मात्र श्रीमंतांनी माझी साथ दिली नाही. त्यांनी साथ का दिली नाही, ते मला माहिती नाही. मी संजीवराजे नाईक निंबाळकरांना विधान परिषदेवर पाठवणार होतो. परंतु, श्रीमंत (रामराजे) नको म्हणाले”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar warns ramraje naik nimbalkar ncp in phaltan maharashtra assembly election 2024 asc