दोन वर्षांपासून शिवसेनेत उभी फूट पडून पक्षाचे दोन गट झाले. ठाकरे गट आणि शिंदे गटात विभागणी झाल्यानंतर राज्यात वेगळं राजकीय समिकरण पाहायला मिळालं. परंतु, या बंडाआधी उद्धव ठाकरेंना अनेकदा अनेकांनी माहिती दिली होती. परंतु, त्यांनी दुर्लक्ष केलं असल्याची दावा केला जातोय. तसंच, याबाबत अजित पवारांनाही माहिती होती, असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले.
अजित पवार यांना आमच्या बंडाची कल्पना होती. त्यांनी ती उद्धव ठाकरेंना सांगितली होती. मात्र त्यांच्या चमच्यांनी त्यांची दिशाभूल केली. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी लक्ष दिले नाही. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी केलेली धावपळ आपण पहिली, असं संजय शिरसाट म्हणाले.
हेही वाचा >> ‘भाजपाच्या बड्या नेत्याची मल्लिकार्जुन खरगेंबरोबर गुप्त बैठक’; प्रकाश आंबेडकरांच्या गौप्यस्फोटाने राजकारणात खळबळ
उद्धव ठाकरे गटाच्या जाहीरनाम्यात महिला संरक्षण विषय आहे. महिलांचा आदर करू म्हणतात, मात्र स्वप्ना पाटकर या महिलेवर काही लोक पाळत ठेवत आहेत. बीकेसीला जाताना एक मोटार सायकल तिचा पाठलाग करते, तिला धमक्या येतात, तिच्या जीवाला धोका आहे. तिने पोलिसात अनेक तक्रारी दिल्या आहेत. प्रकरण गंभीर आहे. मात्र कारवाई का होत नाही? असा त्यांचा सवाल आहे. या संदर्भात एसआयटी स्थापन करा अशी त्यांची मागणी आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहे आणि त्या महिलेला न्याय द्यावा ही मागणी करणार आहे, असंही संजय शिरसाट म्हणाले.
शिवसैनिक दुखावला गेलाय
“एक व्हीडिओ मी पाहिला. शरद पवार उद्धव ठाकरेंना बाहेर बसायला सांगत आहेत. ४ जून नंतर अवस्था काय होईल ते देवाला आणि अल्लाहला माहिती, असंही ते म्हणाले. तसंच, आमदार आणि खासदारांबाबत तुम्ही जे म्हणताय त्यामुळं शिवसैनिक दुखावला गेलाय. या इतक्या लोकांनी अनेक वर्षे शिवसैनिकांसोबत काम केलंय, सेना जपली आहे, तुमची वक्तव्य पहा. बाळासाहेब आमचं दैवत आहेत, आम्ही हिंदूहृदयसम्राट म्हणण्याची ताकत ठेवतो. तुमच्या नेत्यांना राहुल, पवारांना असे बोलायला लावा”, असं आव्हानही त्यांनी दिलं.
“अमित शाह म्हणतात ते सत्य आहे. नारायण राणे बाळासाहेबांचे कवच म्हणून काम करायचे. आजही राणे बाळासाहेबांबाबत एक शब्दही बोलत नाही”, असंही ते म्हणाले.
आम्ही संजय राऊतांना मॅनेज केलं
आम्ही संजय राऊतांना मॅनेज केले. म्हणूनच त्यांनी श्रीकांत शिंदेंविरोधात कमी ताकदीचा उमेदवार दिला असावा, असा दावाही त्यांनी केला.