राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे. आज विधानसभेमध्ये झालेल्या विश्वासदर्शक ठरावामध्ये शिंदे सरकारने १६४ विरुद्ध ९९ मतांनी बाजी मारल्यानंतर विरोधात असणाऱ्या उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना आमदारांबरोबरच राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बाजू सभागृहामध्ये अजित पवार मांडतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अजित पवारांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं अभिनंदन केलं. विशेष म्हणजे यावेळेस देवेंद्र फडणवीसांना ७२ तासांचं सरकारही आठवलं.
नक्की पाहा >> Video :…अन् तो प्रसंग सांगताना सभागृहामध्येच एकनाथ शिंदेंचा कंठ दाटून आला
अजित पवार यांची विरोधी पक्षनेता म्हणून घोषणा करण्यात आल्यानंतर अनेक सभासदांनी त्यांच्या जागेवर जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी, “शरद पवार यांनी अजित पवारांची या पदी निवड केल्याबद्दल मी आभार मानतो,” असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना शिंदेंनी अजित पवार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतानाच विरोधी पक्षनेता हा जतनेची बाजू सरकारसमोर मांडणारा असतो असं सांगतानाच सरकार रुपी हत्तीवर नियंत्रण ठेवणारा महुतासारखा तो काम करतो, अशा शब्दांमध्ये विरोधी पक्षनेत्याची भूमिका सांगितली.
पुढे बोलताना एकनाथ शिंदेंनी अजित पवार सलग सात वेळा बारामतीमधून निवडून आल्याचं सांगताना कधीही सभागृहात इकडचा शब्द तिकडे न होऊ देणारा नेता असा त्यांचा उल्लेख केला. अजित पवार हे तळागाळातील लोकांची नाळ ओळखणारे आणि समस्यांची जाणीव असणारे नेते असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. अजित पवारांसारख्या विरोधी पक्षनेत्यासोबत काम करुन राज्याचा विकास करायचा आहे, अशी इच्छाही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली.
नक्की पाहा >> Video: विधानसभेच्या दारात शिवसेनेच्या बंडखोर आमदाराला पाहताच आदित्य ठाकरे त्याला म्हणाले, “एवढे जवळचे असून…”
एकनाथ शिंदेंनंतर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या अभिनंदन प्रस्तावासंदर्भात बोलताना पहाटेच्या शपथविधीनंतर स्थापन झालेल्या सरकारबद्दल भाष्य केलं. अजित पवारांना सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला आहे. ते एक सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून काम करतील असं सांगताना फडणवीसांना पुढे, “आम्ही ७२ तासांच्या मंत्रीमंडळाचे सहकारीही होतो,” असंही म्हटलं. ग्रामीण, क्रीडा शेती अशा सर्वच क्षेत्रांची जाण अजित पवारांना आहे. त्यांच्यामुळेच मंत्रालयामधील काम सुरु रहायचं, त्यांनी केवळ पवारांचे पुतणे ही आपली ओळख ठेवली नाही, अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी अजित पवारांचं कौतुक केलं.
अजित पवारांच्या सूचनांचा नक्कीच सरकारला फायदा होईल असं सांगतानाच अजित पवारांच्या प्रगल्भतेचा आणि सल्लांचा आम्ही नक्कीच विचार करु, असं फडणवीस म्हणाले. तसेच तुम्ही या पदावर असेपर्यंत नक्कीच ही जबाबदारी यशस्वीपणे पार पडाल असा विश्वास वाटतो असंही फडणवीस यांनी म्हटलं.