गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवार ‘नॉट रिचेबल’ असल्याच्या बातम्याही प्रसारमाध्यमांतून समोर येत होत्या. या सर्व घटनाक्रमानंतर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच आहे. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करणार, असंही अजित पवार म्हणाले होते.
दरम्यान, महाराष्ट्रात विविध ठिकाणी ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले अजित पवारांचे काही बॅनरही लावण्यात आले. अशी एकंदरीत राजकीय स्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारच… वेट अँड वॉच… असं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचं राजकारण सांभाळेल, असा महाराष्ट्रात अजित पवारांसारखा दुसरा नेता नाही, हे अमित शाह यांनी स्वत: कबुल केलं आहे, असंही मिटकरी म्हणाले. ते बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
हेही वाचा- शरद पवार की नरेंद्र मोदी? आवडत्या नेत्याबद्दल राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
अमोल मिटकरी यावेळी म्हणाले, “सध्याच्या घडीला महाराष्ट्राचं राजकारण सांभाळू शकेल, असा अजित पवारांसारखा दुसरा तोलामोलाचा नेता महाराष्ट्रात नाही, हे दस्तुरखुद्द अमित शाह यांनी कबुल केलं आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री होणारच आहेत. वेट अँड वॉच. “
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे सक्तीच्या रजेवर गेले आहेत, त्याचा कृपा करून याच्याशी संबंध लावू नका” असा उपरोधिक टोलाही मिटकरींनी लगावला. “महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि अजित पवार मुख्यमंत्री पदावर दिसतील,” असं मोठं विधान अमोल मिटकरी यांनी केलं आहे. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.